ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्राचा शेवटचा राजापूर बंधारा ओवरफ्लो….
कोल्हापूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील राजापूर इथल्या कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचे सर्वच बरगे बसवून १४ फूट पाण्याची लेव्हल करण्यात आली आहे. कर्नाटकात पाणी सोडण्याची विनंती कर्नाटक सरकारनं पाटबंधारे विभागाला केली होती. मात्र त्यापूर्वीच धरणातील पाण्याचा विसर्ग आणि अवकाळी पावसामुळे पंचगंगा नदीही प्रवाहित झाल्यानं राजापूर बंधारा ओवरफ्लो झाला आहे.
राजापूर बंधाऱ्याला बर्गे घातल्यानं कर्नाटकात जाणारं पाणी थांबलं होतं. त्यामुळे पात्र कोरडे पडल्यानं सीमा भागातील गावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. पंधरा दिवसांत झालेल्या अवकाळी पावसानं शेतीचा पाणी उपसा बंद आहे.
त्यामुळे पाणीपातळी १६ फूट होऊन ऐन उन्हाळ्यात बंधारा ओव्हरफ्लो होऊन बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी अशीच परिस्थिती निर्माण होऊन बंधारा ओव्हरफ्लो झाला होता. या वर्षी दुसऱ्यांदा बंधारा ओव्हरफ्लो होऊन कर्नाटकच्या दिशेनं पाणी वाहत चाललं असून, पाण्याची चातकासारखी वाट पाहणाऱ्या कर्नाटकातील गावांना यामुळे दिलासा मिळाला आहे, तर बंधाऱ्यावरील संरक्षणासाठी असलेल्या पोलीस आणि पाटबंधारे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला आहे.
राजापूर हा कृष्णा नदीवरील महाराष्ट्राचा शेवटचा बंधारा असून शिरोळ तालुक्यासाठी वरदायी आहे. बंधार्याच्या बॅक वॉटर मुळे जवळपास शिरोळ तालुक्याची शेती आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागते. कर्नाटकाला त्यांच्या मागणीनुसार प्रत्येक वर्षी या बंधाऱ्यातून उन्हाळ्यात सुमारे २ टीएमसी पाणी देण्यात येते; मात्र यंदा कमी पावसामुळे पाण्याची टंचाई गृहीत धरून बंधाऱ्याचे सर्व बरगे घालण्यात आले आहेत.
पंधरा दिवसांत तीनवेळा वळीव पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतीच्या पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पाण्याची बचत झाल्यानं नदीतील पाणीपातळी १६ फुटांवर गेली आहे. रविवारी बंधाऱ्यावरून पाणी ओव्हरफ्लो होऊन कर्नाटकाच्या दिशेनं वाहू लागलं. आहे. ४५० क्युसेकनं पाण्याचा कर्नाटकात विसर्ग होत आहे. या बंधाऱ्यावरील वाहतूक सुरू करण्यासाठी चार दरवाजांचे १ फुटाने बरगे काढण्यात येणार असल्याचं पाटबंधारे अभियंता रोहित दानोळे यांनी सांगितलं.
ML/ML/SL
27 May 2024