महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला; शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई —-गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः जोरदार बॅटींग केल्यानंतर आता वरुणराजा थोडासा विश्रांती घेताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागांत हवामान बदलले असून उन्हाची चाहूल लागली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये पावसाचा जोर राज्यभरात कमी होताना दिसणार आहे.
सततच्या पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांनाही यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य भारतात सक्रिय असणारी कमी दाबाची प्रणाली पाकिस्तानच्या दिशेने सरकत असल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात आकाश ढगाळ असले तरी मुसळधार पावसाला ब्रेक लागला आहे.
मागील चोवीस तासांत अनेक भागांत पावसाने पाठ फिरविल्याचे दिसले आहे. याच वेळी दक्षिण भारतात बंगालच्या उपसागरापासून आंध्र किनारपट्टीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तेथील राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती कायम राहणार असली तरी महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.
मुंबई व कोकणात हवामान हळूहळू स्वच्छ होऊ लागले असून अनेक भागांत निरभ्र आकाश आणि सूर्यप्रकाश अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मराठवाड्यात मात्र विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकामांचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान ला निना प्रणाली सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच हिंदी महासागरातील द्विध्रुवीय आयओडी नकारात्मक होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
या परिस्थितीचा मान्सूनच्या माघारीवर नेमका काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ला निना ही पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान घटण्याची स्थिती असून त्यामुळे जागतिक पातळीवर हवामानात मोठे बदल होतात. विशेषत: पावसाच्या प्रमाणावर याचा परिणाम जाणवतो. सध्या मात्र महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाल्याने हवामानात सुधारणा दिसत आहे.
मुंबई व कोकणात सूर्यप्रकाशाची चाहूल लागली असून मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता कायम आहे.
शेतकऱ्यांसाठीही यावेळी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर कमी होत असल्याने तुरी, सोयाबीन, उडीद यांसारख्या पिकांना लागणारी वाढीची खते टप्प्याटप्प्याने द्यावीत.
तसेच वेळोवेळी शेतात फेरफटका मारून पिकांची तपासणी करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीडनाशकांची फवारणी करावी, असा सल्लाही हवामान विभाग व कृषितज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.AG/ML/MS