आजपासून महाराष्ट्र शाहीर प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृष्णराव गणपतराव साबळे अर्थातच महाराष्ट्राला सुपरिचित असलेले लोकशाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट आजसंपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. गेल्या महिन्याभराहून अधिक काळ सोशल मिडीयावर या चित्रपटाचे टिझर आणि गाणी उपलब्ध झाल्यामुळे रसिकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता लागुन राहीली आहे. या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्याच्या हुक स्टेप्सचे हजारो रिल्स सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अंकुश साबळे याने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. तर केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे हीने या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सनाने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. तर अश्विनी महांगडे हिने शाहीरांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये आणि तत्कालिन सामाजिक चळवळींमध्ये शाहीर साबळे यांचे महत्त्वाचे योगदान राहीले आहे. २०२३ हे शाहीरांचे जन्मशताब्दीवर्ष असून या निमित्त केदार शिंदे या त्यांच्या नातवाने या चित्रपटाची निर्मिती करून त्यांना श्रद्धांजली वाहीली आहे.
अजय-अतुल चे बहारदार संगीत, लहानगा गायक जयेश खरे याचा दमदार आवाज, आणि गुरु ठाकूरचे शब्द यांनी या चित्रपट सजला आहे. वसुंधरा साबळे, ओंकार दत्त आणि प्रतिमा कुलकर्णी यांची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या निमित्ताने ६० च्या दशकातील महाराष्ट्रातील सामाजिक घुसळण आणि त्यातील शाहीरांचे महत्त्व नवीन पिढीला पाहता येणार आहे.
SL/KA/SL
28 April 2023