“ऐसपैस गप्पा नीलमताईंशी” ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

 “ऐसपैस गप्पा नीलमताईंशी” ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे संस्थेचा ११९ वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा दिनांक २६ ,२७ मे, २०२४ रोजी पुण्यातील एस.एम.जोशी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे अत्यंत प्रतिष्ठेचे असे वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कार तसेच मसाप जीवनगौरव पुरस्कार, डॉ.भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार या समारंभात वितरीत केले जाणार आहेत. करुणा गोखले लिखित विधानपरिषदेच्या उप सभापती, संवेदनशील लेखिका, स्त्रीवादी सामाजिक आणि राजकीय नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावर आधारित “ऐसपैस गप्पा नीलमताईंशी” या ग्रंथाला ललितेतर/वैचारिक गटातील गणेश सरस्वती ठाकूरदेसाई पुरस्कार जाहिर झाला आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत लेखिका करुणा गोखले हा पुरस्कार दिनांक २६ मे रोजी स्वीकारतील. सकाळी ११:०० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्य अकादमी, नवी दिल्ली, अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक माधव कौशिक हे असतील तर अध्यक्षस्थान ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे हे भूषविणार आहेत.

“ऐसपैस गप्पा नीलमताईंशी” या ग्रंथामध्ये विधानपरिषद या ज्येष्ठांच्या सभागृहाच्या उप सभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्याशी मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून संवाद साधत लेखिका करुणा गोखले यांनी महाराष्ट्रातील स्त्री चळवळ, महिलांचा राजकीय सहभाग, दलित चळवळ आणि दलितेतर, विविध राजकीय पक्ष आणि त्यात स्त्री नेतृत्वाला मिळणारी वा नाकारली जाणारी संधी, राजकारण्यांमधील साहित्यसृजन, फेमिनिस्ट फॉरेन पॉलिसी असा विस्तृत पट उभा केला आहे. गत चार दशकांतील राजकीय आणि सामाजिक चळवळीतील महत्वाचे दुवे तपासून बघण्यासाठी ‘राजहंस’ तर्फे प्रकाशित हा नीरक्षीर ठेवा एक महत्वाचा आणि उपयुक्त असा दस्तावेज ठरला आहे.

या ग्रंथाचे सर्व स्तरातील वाचकांकडून स्वागत होत आहे.
हा ग्रंथ बुकगंगा आणि ॲमेझॉनवर देखील खालील लिंकवर उपलब्ध आहे.
https://www.bookganga.com./R/8SETW
https://amzn.eu/d/c8CK8vX

ML/ML/SL

21 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *