तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना…

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. असं असलं तरी दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या पूर्ण २८८ उमेदवारांची यादी, अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. एकूण २८८ जागांपैकी महायुतीच्या सहयोगी पक्षांसह २८५ जागा तर महाविकास आघाडीच्या २७४ जागा जाहीर झाल्या आहेत. उर्वरित जागांविषयीची नेमके काय याची स्पष्टता आता तरी आलेली नाही.एकूणच तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था दोन्ही बाजूंनी झाली आहे.
दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन प्रमुख पक्ष अधिक त्यांचे मित्र सहयोगी पक्ष यांच्यासाठी जागावाटप करताना सर्वच प्रमुख नेत्यांच्या नाकी नऊ आले असून दोन्ही बाजूंनी जागावाटपाचे गणित सुटत नसल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या अद्याप तीन जागांची स्पष्टता नाही त्यावर एक दोन ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते असे देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर करून टाकले आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर कोणतेही जाहीर भाष्य केले नसले तरी त्यांनी अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत.महायुतीत १४८ जागा भाजपानं जाहीर केल्या आहेत, तर ४ जागा सहयोगी पक्षांसाठी सोडल्यानंंतर, त्यांचा आकडा १५२ पर्यंत पोहोचतो.
शिवसेनेनं ८० जागा जाहीर केल्या असून, २ जागा सहयोगी पक्षांसाठी सोडल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ५१ जागा जाहीर केल्या आहेत. महाविकास आघाडीत सर्वाधिक १०३ जागा काँग्रेसकडे आल्या आहेत. त्याखालोखाल ८८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तर, ८३ जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्या आहेत.
ML/ML/SL
29 October 2024