महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ
पुणे, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजपासून राज्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धां पुणे येथे रंगणार आहे.यास्पर्धेमध्ये 900 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले असून 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे.पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते आज (दि.10) संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले.
कोथरुड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवान, कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे. भव्य 32 एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून त्यात 12 एकरमध्ये 80 हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे आहेत. त्याचबरोबर अतिमहत्वाच्या व्यक्ती, पैलवान, महिला, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आल्या आहेत. 20 एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचे देखील काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
यंदाची ही कुस्ती स्पर्धा अधिक ऐतिहासिक आणि अटीतटीची होणार आहे. कारण या स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील, बाळा रफिक शेख अशा माजी विजेत्यांसह इतर जिल्ह्यांतील मल्ल मोठ्या ताकदीने या स्पर्धेत उतणार आहेत. पृथ्वीराज पाटीलने गेल्याच महिन्यात राष्ट्रीय विजेतेपद पटकावले, त्यामुळे तो चांगल्याच लयीत असल्याचे मानले जात आहे. तर या तिघांना सोलापूरचा सिकंदर शेख, आंतरराष्ट्राइय कुस्ती संकुलातील किरण भगत, पुणे जिल्ह्याचा हर्षद कोकाटे यांचे तगडे आव्हान असेल.
दरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी या स्पर्धेवर आक्षेप घेत ही स्पर्धा अधिकृत नसल्याचा आरोप केला आहे. मात्र या स्पर्धेला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता असल्यानं ही स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
SL/KA/SL
10 Jan. 2023