महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा पुण्यात, लांडगे मात्र चितपट
पुणे,दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र केसरी स्पर्धा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अहमदनगर येथे होणार अशी माहिती काल समोर आली होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवी कार्यकारणी व जुन्या कार्यकारिणीचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. त्यातुन काल अहमदनगरला स्पर्धा होणार असल्याचे जाहीर झाले होते. मात्र आज हाती आलेल्या माहितीनुसार गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ही स्पर्धा पुणे येथे होणार हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वादावर तोडगा काढण्यात आला आहे. शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना भारतीय कुस्ती संघाने बरखास्त केली होती. त्यानंतर भाजपचे खासदार असलेले रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवी कार्यकारिणी नेमण्यात आली होती. या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपणच भरवणार असल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून करण्यात आला होता.
बाळासाहेब लांडगे यांनी डिसेंबर महिन्यात अहमदनगरमधे तर रामदास तडस गटाकडून जानेवारीत महिन्यात पुण्यात ही स्पर्धा होईल असं जाहीर करण्यात आलं होतं.त्यामुळे नक्की कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायच यावरून पैलवानांमधे संभ्रम निर्माण झाला होता.
शरद पवार आणि बृजभूषण सिंग यांनी यावर तोडगा काढला आहे. यानुसार खासदार रामदास तडस अध्यक्ष आणि काका पवार कार्याध्यक्ष असतील. तर शरद पवार मुख्य सल्लागार आणि बाळासाहेब लांडगे सल्लागार म्हणून काम पाहतील. त्यामुळे, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ११ ते १५ जानेवारीदरम्यान पुण्यात होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
SL/KA/SL
9 Dec. 2022