महाराष्ट्रात भक्ती आणि शक्ती सोबत समजसेवा व्रताची दीर्घ परंपरा
नवी मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. या राज्याची ही प्रदीर्घ परंपरा आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले.
राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले की, कोणत्याही प्रसिद्धीची आस न ठेवता समाज सेवा करणारा हा एवढा मोठा जनसमुदाय मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे. या प्रकारचा मान, सन्मान, भक्तीभाव हा केवळ त्याग, समर्पण व सेवेद्वारेच मिळत असते. आप्पासाहेबांप्रती आपले प्रेम, विश्वास व सन्मान हा त्यांच्या संस्काराचा, कर्तृत्वाचा व नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. एकाच परिवारात अनेक वीर जन्मलेले मी पाहिले आहेत. मात्र, समाजसेवेचे संस्कार तीन तीन पिढ्यांपर्यंत असलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत आहे असेही शहा म्हणाले.
उद्ध्वस्त कुटुंबांना वाचविण्याचं, दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या तीनशे चारशे वर्षांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे.
उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहेत. माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. या सोहळ्याला मी एक श्री सदस्य म्हणून उपस्थित असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनसागराला अभिवादन केले.
डॉ. आप्पासाहेब यांच्याकडे मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला
या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगात सात आश्चर्ये आहेत. मात्र श्री सदस्यांची ही अलोट गर्दी हे जगातील आठवे आश्चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्रीसदस्यांकडे बघून समजते.
निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा दिली जाते. मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे आहे. विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून धर्माधिकारी कुटुंबीय व प्रतिष्ठान करीत असलेले कार्य महान आहे. वृक्षारोपण, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, रक्तदान अशा अनेक क्षेत्रात त्यांचे उत्तुंग काम आहे. देश-विदेशातही त्यांचे मोठे सामाजिक कार्य आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री मनुगंटीवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आप्पासाहेबांच्या निरुपणाचा भक्ती सागर पाहण्याचा योग आज आला. आप्पासाहेब धर्माधिकारी नावाचा जगातील सर्वात मोठा चुंबक आज या व्यासपीठावर आहे.
निरुपणाच्या माध्यमातून जसे आप्पास्वारी मन स्वच्छ करतात तसं ते परिसरही स्वच्छ ठेवतात. झाडे लावून पर्यावरणसुद्धा वनयुक्त करता तेव्हा असे कोटीकोटी पुरस्कार दिले तरी त्यांचा गौरव शब्दांने होऊ शकणार नाही. हाताला सेवेचे काम देऊन भविष्य घडविणाऱ्या आप्पासाहेबांना सांस्कृतिक कार्य विभागाचा पुरस्कार देताना प्रचंड स्फूर्ती प्राप्त होत आहे.
पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द
कोकण विभागासह राज्यातील विविध भागातून आलेल्या सुमारे 20 लाखाहून अधिक श्री सदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व पंचवीस लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. धर्माधिकारी यांनी पुरस्काराची पंचवीस लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केली.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने यावेळी लाखोच्या संख्येने उपस्थित श्री सदस्यांवर यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
भव्यदिव्य कार्यक्रम
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या उत्साहात नवी मुंबईतील खारघर येथील कार्पोरेट पार्कच्या मैदानावर हा भव्य समारंभ संपन्न झाला. समारंभात पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा, वाहनतळ सुविधा, श्री सदस्यांची बसण्याची व्यवस्था आदींचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी शासकीय यंत्रणेसह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी व्यवस्था चोख सांभाळली.
या कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीनशेहून अधिक एकर मैदानात सुमारे 20 लाखाहून अधिक नागरिक, श्रीसदस्य उपस्थित होते. त्यांना कार्यक्रम व्यवस्थित दिसावा यासाठी एकूण 58 भव्यदिव्य असे एलईडी स्क्रिन उभारण्यात आले होते. त्याचबरोबर प्रत्येक सदस्यांपर्यंत कार्यक्रमाचा आवाज पोहचावा, यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा उभारण्यात आली होती.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे लेखन प्राची गडकरी यांनी केले होते. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यावर आधारित ध्वनिचित्रफित यावेळी दाखविण्यात आली. Maharashtra has a long tradition of Samgseva Vrata along with devotion and power
ML/KA/PGB
16 Apr 2023