महाराष्ट्र सरकारने वाहनचालक – मालकांसाठी तत्काळ निर्णय घ्यावा!
मुंबई दि.31(एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील वाहनचालक आणि गाडी मालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, महामार्गांवरील सुरक्षेचा अभाव, पोलिस आणि अधिकाऱ्यांकडून होणारी जबरदस्ती, चोरी-लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ, तसेच सरकारकडून कोणतीही ठोस मदत न मिळणे यामुळे वाहनचालक व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा ऑल इंडिया वाहन चालक-मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश समुखराव यांनी दिला आहे.
देशातील १४० कोटी लोकसंख्येच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या वाहनचालकांच्या समस्यांकडे सरकार आणि प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे. अपघातात वाहनचालकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची सरकारी मदत मिळत नाही. याशिवाय, राज्यातील महामार्गांवर टोलटॅक्स, वाढत्या इंधनदरांचा भार, पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांकडून होणारा अन्याय, तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा अभाव या मुद्द्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी महासंघाने केली आहे.
वाहनचालकांसाठी स्वतंत्र सरकारी धोरण तयार करून त्यांच्या कल्याणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. महामार्गांवरील टोल बंद करावा, राज्यात वाहनचालक अभ्यास आयोग स्थापन करावा, तसेच वाहनचालकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत म्हणून १० लाख रुपये मिळावेत, अशी प्रमुख मागणी आहे. याशिवाय, प्रत्येक १०० किलोमीटर अंतरावर वाहनचालकांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृहांची सुविधा निर्माण करावी. वाहनचालकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत संधी मिळावी आणि डिझेलच्या दरवाढीच्या वेळी गाडी मालकांचे भाडे वाढवण्याची अधिकृत तरतूद करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.
वाहनचालकांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महामार्गांवरील सुरक्षेचा अभाव, पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांकडून होणारी जबरदस्ती, चोरी-लुटमारीसारख्या घटनांमध्ये वाढ, तसेच सरकारकडून कोणतीही ठोस मदत न मिळणे यामुळे वाहनचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा लवकरच मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा रमेश समुखराव यांनी दिला आहे.