महाराष्ट्र सायबरची डीपफेक क्लीप अपलोड करणाऱ्यांवर कारवाई
मुंबई, दि. १२ : मुंबईत लोकप्रिय युट्यूबर पायल गेमिंगशी संबंधित कथित डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून सार्वजनिकरीत्या माफी मागण्यास भाग पाडण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह डीपफेक कंटेंट अपलोड व प्रसारित करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला आहे. काही आरोपींनी माफी मागितली असून मूळ व्हिडिओ अपलोड करणाऱ्याची ओळख पटली आहे आणि त्याच्यावरही लवकरच कारवाई होणार आहे.
सायबर विभागाने स्पष्ट केले आहे की तंत्रज्ञानाचा गैरवापर व कायद्याचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. त्यांनी आरोपींचे फोटो व माफीचे व्हिडिओही शेअर केले आहेत. यामध्ये अभिषेक नावाचा तरुण इन्स्टाग्रामवर व्हिडिओची लिंक शेअर केल्याबद्दल माफी मागताना दिसतो. त्याने पडताळणी न करता लिंक शेअर केल्यामुळे पायल गेमिंगच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे मान्य केले. सायबर विभागाच्या समुपदेशनानंतर त्याला आपली चूक लक्षात आली असून भविष्यात असे पुन्हा करणार नसल्याचेही त्याने सांगितले.
गेल्या महिन्यात एका जोडप्याचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओतील तरुणी पायल गेमिंग असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार केलेला डीपफेक असल्याचे सांगत पायलच्या बाजूने भूमिका घेतली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पायल गेमिंगने स्वतः स्पष्टीकरण देत, त्या व्हिडिओतील व्यक्ती आपण नसल्याचे स्पष्ट केले आणि कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही जाहीर केले.
SL/ML/SL