मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई, दि १९
महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या महायुतीच्या विकासाच्या धोरणाला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत मुंबईतील मतदारांनी महायुतीला भरभरून कौल देत उबाठा सेनेला त्यांची जागा दाखवून दिली आहे. जनमताचा आदर राखत मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होणार आहे आणि महायुतीचा भगवा फडकणार आहे. ज्या दिवशी मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होईल तो दिवस मुंबईकरांसाठी सुवर्ण दिवस असणार आहे आणि उबाठा गटासाठी 16 जानेवारी हा निकालाचा दिवस काळा दिवस ठरला आहे अशी सणसणीत टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊतांनी कितीही मुंबईच्या महापौरपदाची दिवास्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत असा प्रहारही त्यांनी केला.
यावेळी श्री. बन म्हणाले की, कुठल्या पक्षाचा महापौर व्हावा हा महायुतीचा अजेंडा कधीच नव्हता. मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्ता उपभोगताना उबाठा गटाने मुंबईला लुटले होते. ती लूट थांबवून मुंबईचा विकास आणि मुंबईकरांचे जीवन सुकर आणि सुरक्षित करणे हे एकच ध्येय महायुतीचे आहे. भाजपा, शिवसेनेचे वरिष्ठ नेते चर्चेअंती लवकरच निर्णय घेतील तोपर्यंत राऊतांनी वायफळ बडबड करू नये. राऊत जी-जी स्वप्ने पाहतात ती कधीच पूर्ण होत नाहीत, अशी कोपरखळीही श्री. बन यांनी मारली. 29 पैकी 25 ठिकाणी भाजपा अव्वल ठरली आहे, हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणाचा आहे असेही त्यांनी नमूद केले.
मानखुर्दमधील विजय हा एका व्यक्तीचा नव्हे तर त्या परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे.
मानखुर्द शिवाजीनगर मुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार पराभूत झाला होता हे जनतेला कळून चुकले होते. त्या पराभवाचा बदला घेण्याचे काम मतदारांनी यावेळी केले आणि विकासाला कौल देत भाजपाचा उमेदवार म्हणून मला निवडून दिले असे श्री. बन यांनी नमूद केले. मानखुर्दमध्ये मला मिळालेला विजय हा एका व्यक्तीचा नव्हे तर हा त्या परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे.
राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकते. आज राऊतांना उपरती होऊन त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. खरे तर राऊतांच्या कौतुकपर शब्दांची देवेंद्रजींना गरजच नाही, कारण त्यांचे काम आणि विकास कामे यामुळेच मतदारांचा आशीर्वाद कायम मिळत आला आहे. पण तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याबद्दल भाजपाच्या संस्कारांनुसार आभार मानतो असा श्री. बन यांनी खोचक टोला लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भीतीपोटी नगरसेवकांना एकत्रित ठेवले नाही. भीती शिवसेनेला नाही तर उबाठा गट आणि राऊतांना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवनियुक्त नगरसेवकांचा एकमेकांशी परिचय व्हावा या उद्देशाने नगरसेवकांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यावरून राऊतांनी उगाच खयाली पुलाव शिजवू नये. नगरसेवकांना एकत्रित ठेवण्यामुळे कुठे वेगळी आघाडी जन्माला येईल, नवे समीकरण तयार होईल अशा हाकाट्या पिटू नयेत असा टोला श्री. बन यांनी लगावला.
महाराष्ट्रात बिहार भवन होणार असेल तर त्यात गैर काय आहेः
महाराष्ट्रात बिहार भवन होणार असेल तर त्यात गैर काय आहे, असा सवाल करत श्री. बन म्हणाले बिहारमध्ये देखील महाराष्ट्र भवन आहे. ठिकठिकाणी महाराष्ट्र भवने आहेत बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय व्हावी या हेतूने ही भवने वेगवेगळ्या राज्यात उभारली जातात. या विषयावरून मनसे विनाकारण प्रांतवाद उकरून काढत आहे. अशा पद्धतीचा प्रांतवाद, भाषावाद केल्यामुळे मनसे पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार राज ठाकरे यांनी करावा असा टोला श्री. बन यांनी लगावला.KK/ML/MS