महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती
कोल्हापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना बाबत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नियमावलीनुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती केली आहे.
आजपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.कोरोनाबाबत राज्य शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत, तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीनं खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं शिवराज नायकवाडी यांनी सांगितलं.
यानुसार मंदिर परिसरात सक्रीय असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकारी, पुजारी, सुरक्षा रक्षक तसंच अन्य सर्व कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती राहणार आहे; मात्र भाविकांना मास्कची सक्ती नाही.
दररोज सुमारे दहा ते पंधरा हजार भाविकांच्या संपर्कात देवस्थानचे कर्मचारी येत असतात; यामुळे त्यांच्या स्वसंरक्षणासाठी मास्क सक्ती करण्यात आल्याचं नाईकवाडे यांनी सांगितलं.
ML/KA/SL
23 Dec. 2022