सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाडमध्ये पूर स्थिती…

 सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाडमध्ये पूर स्थिती…

महाड दि १५ (मिलिंद माने)– कोकणात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे पाणीटंचाई जरी निर्माण झाली नसली तरी सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पाणी साठवण करणारी धरणे ओसंडून वाहू लागली. मात्र जुलै महिन्यात मागील दोन दिवसात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील महाड पोलादपूर तालुक्यासह रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमावरती भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाडमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून महाड शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

कोकणात मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाला देखील याचा मोठा फटका सहन करावा लागला. आंबे, काजू यासह करवंदे ,जांभळे विकून पोट भरणाऱ्या आदिवासी कातकरी समाजाच्या कुटुंबावर देखील मोठी आपत्ती कोसळली, तसेच मे महिन्यापासून चालू झालेला पाऊस थांबत नसल्याने शेतकऱ्यांना भात पिकाची पेरणी देखील उशिरा करावी लागली. त्यानंतर चालू झालेला पाऊस थांबण्याची नावच घेत नाही.

त्यातच मागील दोन दिवसापासून सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील महाड पोलादपूर तालुक्यात व रत्नागिरी, सातारा. पुणे जिल्ह्याचे हद्दीवरील पर्वतरांगांवर पडणाऱ्या पावसाचे पाणी थेट रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यातून सावित्री, काळ ,गांधारी, नागेश्वरी. मल्लिकार्जुन या नद्यांद्वारे थेट सावित्री खाडी मध्ये येऊन मिळते. सावित्री खाडीला भरती आल्याने त्याचा थेट परिणाम नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाह वर होऊन पाण्याचा फुगोटा निर्माण होऊन महाड शहरात पाणी भरते.

महाड पोलादपूर तालुका सह डोंगरमाथ्यावर सोमवारी चालू झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी ढग सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. याचा परिणाम पोलादपूर शहरात सावित्री नदीचे पाणी भरले त्याच पद्धतीने महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग रायगड रत्नागिरी जिल्हाला जोडणाऱ्या फाळकेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर ढग फुटी सदृश्य पाऊस निर्माण झाल्याने त्याचा परिणाम थेट ग्रामीण भागातील रस्त्यांवर झाला. यामुळे अनेक जिल्हा मार्ग काही काळासाठी बंद झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. एकंदरीत महाड शहरात सकाळपासूनच पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

महाड व पोलादपूर तालुक्यात दरवर्षी साधारणता२,५०० मिलिमीटर पाऊस पडल्याचा आत्तापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असली तरी मे महिन्यापासून चालू झालेल्या अवकाळी पावसाने जेमतेम आत्तापर्यंत१ ५०० मिलिमीटर पर्यंत सरासरी पावसाची आकडेवारी गाठली आहे. एकंदरीत अजून १,०००मिलिमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता दरवर्षीच्या आकडेवारीवरून वर्तवली जात आहे. मात्र सन २०२१ सारखी पूर परिस्थिती चालू वर्षी पावसाळ्यात उद्भवण्याची शक्यता नसली तरी समुद्राच्या पाण्याच्या भरती वरती व सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची सरासरी यावरच महाड पोलादपूर सह ग्रामीण भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज व वृद्ध नागरिकांकडून वर्तवला जात आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *