महाडीबीटी पोर्टल वरील तांत्रिक अडचणी दूर करा… हाजी अराफत शेख

मुंबई, दि ११–महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती बाबत अनेक तक्रारी येत असून हे पोर्टल वारंवार बंद पडते त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही याबाबत हाजी अराफत शेख यांनी भरणे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन सादर केले. त्यावर अल्पसंख्यांक विकास विभागाचे मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी महाडीबीटी गव्हर्नमेंट पोर्टलवरील तांत्रिक अडचणींची तातडीने दखल घेत त्या सोडविण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
या भेटीत महाडीबीटी शिष्यवृत्ती पोर्टलवरील वारंवार येणाऱ्या त्रुटींबाबत चर्चा करण्यात आली. सर्व्हरवरील एरर, लॉगिनसंदर्भातील अडचणी, कागदपत्रे अपलोड न होणे आणि अर्ज सादर करताना प्रणालीतील अडथळे यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण राहतात. परिणामी, शिष्यवृत्तीच्या संधी गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषत: आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी ही स्थिती अत्यंत गंभीर असून या तांत्रिक समस्यांमुळे त्यांच्यावर मानसिक तणाव वाढला आहे व शैक्षणिक लक्ष विचलित होत आहे.
या सर्व बाबींची सखोल चर्चा मंत्री महोदयांशी करण्यात आली असता त्यांनी तात्काळ चौकशी करून दोन दिवसांत तांत्रिक अडचणी सोडवण्याचे स्पष्ट आदेश दिले.
सर्व समस्या सुटेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवावी, तसेच विद्यार्थ्यांसाठी एक स्पष्ट आणि त्वरित प्रतिसाद देणारी मदत सुविधा सुरू करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
या निर्णयामुळे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, हाजी अरफात शेख यांच्या पुढाकारामुळे शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेतील अडथळ्यांवर मार्ग निघण्यास मदत होणार आहे.अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. या वेळी आमदार विक्रांत पाटील, तसेच समीर काझी चेअरमन वक्फ बोर्ड उपस्थित होते. KK/ML/MS