इतर मुलींना संन्यासी बनण्यास प्रोत्साहित का करता? मद्रास उच्च न्यायलयाचा जग्गी वासुदेव यांना सवाल
सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’बाबत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे. भारतासह जगभरात अनुयायी असणाऱ्या इशा योगा केंद्राविरोधात एका निवृत्त प्राध्यापकानं मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याबाबत न्यायालयात रीतसर सुनावणी चालू आहे. वासुदेव यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न करून तिचे जीवन स्थिर केले आहे, पण ते इतर मुलींना संन्यासी बनण्यास प्रोत्साहित का करत आहेत?, असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाने केला. जस्टिस एस.एम. सुब्रमण्यम आणि जस्टिस व्ही. शिवगनम यांच्या खंडपीठाने हा प्रश्न एक निवृत्त प्राध्यापकाच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान विचारला. ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव यांच्यावर तमिळनाडूतील माजी प्राध्यापक एस. कामराज यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या दोन मुलींना ईशा फाऊंडेशनमध्ये ब्रेनवॉशिंग करून ठेवण्यात आल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, आम्ही कुणालाही लग्न करायला किंवा संन्यास घ्यायला सांगत नाही. कारण या पूर्णपणे वैयक्तिक निवडीच्या बाबी आहेत. इशा योगा केंद्रामध्ये संन्यास न स्वीकारलेले हजारो लोक आहेत. त्याशिवाय, ब्रह्मचर्य स्वीकारलेले किंवा संन्यासी झालेलेही काही आहेत”, असं निवेदन इशा फाऊंडेशनकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.