या मराठी चित्रपटातून माधुरी दीक्षितचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘पंचक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘पंचक’चा उत्कंठावर्धक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. घरात पंचक लागल्यामुळे ‘आता कोणाचा नंबर’ या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली होती. टीझरनंतर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर स्टारकास्ट दिसणार आहे. चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांचे आहे.
रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये, ‘आता कोणाचा नंबर?’ हा प्रश्नार्थक हावभाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. पोस्टरमध्ये प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवत असतानाच आदिनाथ कोठारे मात्र दोन्ही हात कानावर ठेवून ही सर्कस थांबवू पाहतोय.या उत्कंठावर्धक पोस्टरनंतर माधुरीची निर्मिती असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
SL/KA/SL
5Dec.2023