ताडोबात पार पडली मचाण वन्यजीव गणना, वन्यजीव प्रेमींनीही घेतली संधी

चंद्रपूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर (म्हणजेच गाभा आणि बाह्य) क्षेत्रात वन्यजीवांची संख्या किती आहे, त्यांचा वावर कोणकोणत्या भागात आहे, कोणता प्राणी कुठे दिसतो, याची माहिती संकलित करण्याच्या उद्देशानं मचाण प्राणीगणना केली जाते. वन्यजीवप्रेमींची नवी पिढी घडविण्यासाठी असे अभियान राबविण्याची वनविभागाची ही जुनी कवायत आहे.
या प्रक्रियेला शास्त्रीय मान्यता किंवा आधार नसला तरी ढोबळमानानं प्राण्यांची कल्पना यावी, यासाठी ती दरवर्षी बुद्धपौर्णिमेला केली जाते. याही वर्षी ती पार पडली. बुद्धपौर्णिमेला पूर्णचंद्र असतो आणि तो अधिक प्रकाशमान असतो. त्यामुळं दिवस-रात्र मचाणीवर बसून प्रगणकांना प्राण्यांची गणना सोयीची होते. लोखंडी मचाणींची उभारणी, प्रगणकांना थंड पाण्याची सोय, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून डॉक्टरांचं पथक, ने-आण करण्यासाठी अतिरिक्त वाहनांची व्यवस्था यावेळी करण्यात आली. गेले काही दिवस चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसाचे दिवस होते. मात्र यंदा आकाश निरभ्र होते त्यामुळे दिवस-रात्रीच्या जंगलाचा संपन्न अनुभव वन्यजीवप्रेमींना मिळाला.

ML/ML/SL
24 May 2024