मैने प्यार किया, हम आपके है कौन आणि बाजीगरच्या गीतकाराचे निधन

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मैने प्यार किया, हम आपके है कौन आणि बाजीगर अशा लोकप्रिय चित्रपटांचे गीतकार देव कोहली (८१) यांचे आज निधन झाले. देव कोहलींचे प्रवक्ते प्रीतम शर्मा यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की,- कोहलीजी गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते आणि कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी 6 वाजता जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा स्टेडियममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देव कोहली यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1942 रोजी रावळपिंडी, पाकिस्तान येथे झाला. 1949 मध्ये ते दिल्लीत स्थलांतरित झाले. त्यांचे बालपण डेहराडूनमध्ये गेले. १९६९ मध्ये गुंडा या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली.
कोहली यांनी 100 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. त्यात ये काली काली आंखे (बाजीगर), मै नी मै, दीदी तेरा देवर दिवाना, पहला पहला प्यार (हम आपके है कौन), ओ साकी साकी (मुसाफिर), छोटे छोटे भाईयों के बडे भैया (हम साथ साथ हैं) यांचा समावेश आहे. चलती है क्या 9 से 12, उंची है बिल्डिंग (जुडवा) सारखी लोकप्रिय गाणीही त्यांनी लिहिली.
देव कोहलीने ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘जुडवा २’, ‘मुसाफिर’, ‘शूट आउट अॅट लोखंडवाला’ आणि ‘टॅक्सी नंबर ९११’ यांसारख्या १०० हून अधिक हिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यांनी अनु मलिक, राम लक्ष्मण, आनंद राज आनंद, आनंद मिलिंद आणि इतरांसारख्या सुपर हिट संगीत दिग्दर्शकांसोबतही काम केले होते.
ML/KA/SL
26 Aug 2023