लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी

 लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी

मुंबई दि.२६.:- लंडनमधील मराठीजनांना आपल्या हक्काचे आणि स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करुन तेथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने लंडनमधील मराठीजनांना गणेशोत्सवानिमित्त ही भेट दिल्याने तेथील महाराष्ट्र मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र मंडळ, लंडन ही भारताबाहेरील आणि युनायटेड किंगडममधील सर्वात जुन्या मराठी संस्थांपैकी एक आहे.१९३२ मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी या मंडळाची स्थापना केली. लंडन आणि आसपासच्या परिसरातील मराठी बांधवांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. गेल्या ९३ वर्षांपासून हे मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि सामाजिक उपक्रम राबवत आहे.

सध्या लंडन आणि परिसरातील सुमारे एक लाखाहून अधिक मराठी बांधव या मंडळाशी जोडले गेले आहेत. मात्र, स्थापनेपासूनच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची वास्तू भाडेतत्त्वावर होती. त्यामुळे मराठीजनांसाठी स्वतःच्या मालकीचे भवन असावे, अशी तेथील मराठीजनांची मागणी होती.

गेल्या आठवड्यातच मंडळाच्या प्रतिनिधींनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहकार्याची विनंती केली होती. या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने राज्य शासनाने या संस्थेला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी वापरला जाणार असून, यामुळे मराठीजनांना लंडनमध्ये स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र मिळणार आहे.

‘महाराष्ट्र भवन’ हे युनायटेड किंगडम आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, तसेच या भवनामुळे मराठी साहित्य, नृत्य, संगीत आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात सांस्कृतिक आदान-प्रदानाला चालना मिळेल. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भाषा वर्ग, कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करता येईल. यामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *