लोकशाहीची थट्टा करणाऱ्या मोदी आणि भाजपाला धडा शिकवा

नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
देशात सध्या लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही, मागासवर्गीयांना संधी मिळेल म्हणून मोदी सरकार नोकर भरती करत नाहीत. मोदींना जगभर फिरण्यास वेळ आहे पण संसदेचे अधिवेशन सुरु असताना संसदेत येण्यास वेळ नाही. संसदेत प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करून कायदे पास करून घेतले ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीला न जुमनणाऱ्या मोदी तसेच भाजपाला धडा शिकवा असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले.
काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते पुढे म्हणाले की, संविधानाने महिला, गरिब, मागास समाजाला अधिकार दिले ते भाजपा देऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो तर मोदी आरएसएसच्या विचारधारेवर चालतात.
मोदी सरकारने देशावर २०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे पण कल्याणकारी योजनांवरील निधीमध्ये कपात केली जाते, मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही. मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले आहेत. भाजपाला रोखले नाही तर देश बरबाद होईल, संविधान संपुष्टात येईल.
खासदार राहुल गांधी यावेळी म्हणाले की, केंद्रात सत्ता आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी यंत्रणांवर कब्जा केला आहे यातून मीडिया, निवडणूक आयोग, न्यायालयेही सुटली नाहीत. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वास दिले होते पण १० वर्षात मोदींनी किती लोकांना रोजगार दिला? देशात आज ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे. नोकरी नसल्याने कोट्यवधी तरुणांची शक्ती वाया जात आहे. शेतकरी, तरुण संकटात आहे तर दुसरीकडे देशातील दोन-चार उद्योगपतींकडे देशातील सर्व संपत्ती सोपवली जात आहे.
ओबीसी, दलित, मागासवर्गीयांना सत्तेत, प्रशासनात अत्यंत कमी वाटा मिळत आहे. सर्वच क्षेत्रात या समाज घटकांना कमी स्थान दिले जाते. काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली त्यानंतर मोदींची भाषा बदलली आणि देशात गरीब ही एकच जात आहे असे ते बोलत आहेत. देशातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे, हीच काँग्रेसची विचारधारा आहे.
काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करेल तसेच देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे ते मोदी सरकार दे देऊ शकत नाही ते काम काँग्रेस पक्षच करेल. आपल्या मदतीने महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तन आणू असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात जाहीर सभा झाली. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, CWC सदस्य अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांच्यासह देशातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि लाखो लोक उपस्थित होते.मात्र काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यावेळी गैरहजर होत्या.
ML/KA/PGB 28 Dec 2023