लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

पुणे, दि. १६ : लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक जयंत टिळक यांचे आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. डॉ. टिळक हे दीर्घ काळापासून शिक्षण, संशोधन, मराठी भाषा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय होते. त्यांचे विचार स्पष्ट, अभ्यासपूर्ण आणि सामाजिक भान असलेले होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात सुधारणा, नवचेतना आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यावर विशेष भर दिला
डॉ. दीपक टिळक यांच्या पश्चात काँग्रेस नेते असलेले सुपुत्र रोहित टिळक, कन्या, नातवंडे असा परिवार आहे. आज (बुधवारी) सकाळी 8 ते 11 वाजताच्या दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी बारा वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे स्वर्गीय जयंतराव टिळक यांचे ते सुपुत्र होते. जयंतराव टिळक हे 12 वर्षे संसद सदस्य (राज्यसभा) आणि 16 वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष होते.
SL/ML/SL