लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे सोलापूर मध्ये २० वर्षे पूर्ण

 लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे सोलापूर मध्ये २० वर्षे पूर्ण

सोलापूर प्रतिनिधी, दि. २२ : लोकमंगलच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 52 जोडप्यांच्या रेशीमगाठी- जिल्हा पर्यटन थीममुळे सोहळा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

महाराष्ट्र : लोकमंगल फाउंडेशनतर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला यंदा २० वर्षे पूर्ण झाली. २००६ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने आजवर सलग ४६ भव्य विवाह सोहळे आयोजित केले असून, एकूण ३२०५ जोडप्यांचे विवाह सामूहिक पद्धतीने संपन्न केले आहेत. समाजातील दुर्बल व सर्वधर्मीय कुटुंबांना आधार देणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि सातत्याने राबला जाणारा सामुदायिक विवाह सोहळा ठरला आहे.

या सर्व सामाजिक कामगिरीचे मूळ व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी सहकार मंत्री व आमदार सुभाष देशमुख. गेल्या दोन दशकांपासून त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याद्वारे समाजातील अनाठायी विवाह खर्चाला आळा घालणे, सर्वधर्म समभाव वाढवणे आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना उभारी देणे हे उद्दिष्ट साध्य केले आहे.

मागील २० वर्षांत विवाहबद्ध झालेल्या ३२०५ जोडप्यांमध्ये हिंदू 2492, बौद्ध 681, मुस्लिम 21, ख्रिश्चन 04 आणि जैन 07 अशी विविध धर्मीय जोडपी सामील आहेत. यामुळे लोकमंगलचा सोहळा हा प्रत्यक्षात सामाजिक सलोखा व एकतेचा संदेश देणारा उपक्रम ठरतो.

यंदाचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय (D.Ed.) मैदानावर
नुकताच संपन्न झाला. संपूर्ण मैदानात आकर्षक सजावट, सुव्यवस्थित व्यवस्थापन आणि ढोल-ताशांच्या गजरात वातावरण उत्सवमय झाले. या भव्य सोहळ्यात ५२ जोडप्यांनी रेशीमगाठ बांधून वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात केली.

आमदार सुभाष देशमुख आणि सौ. स्मिता देशमुख यांच्या हस्ते यंदाही कन्यादान पार पडले. एकूण ४९ हिंदू आणि ३ बौद्ध विवाह संपन्न झाले. सोहळ्यात मोठ्या संख्येने नातेवाईक, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.

आ. देशमुख यांनी सांगितले की, “समाजातील वधू–वरांना आर्थिक व मानसिक आधार देणे, विवाहातील अनाठायी खर्चाला आळा घालणे आणि दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात सामुदायिक विवाह सोहळा राबवणे हा आमचा संकल्प आहे.”

सकाळी सर्व वधू-वरांसाठी समुपदेशन आयोजित करण्यात आले. वैवाहिक जीवनातील समजूतदारपणा, आर्थिक नियोजन, आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा विविध विषयांवर विशेष चर्चा झाली. त्यानंतर वधूंना शालू, वरांना सपारी आणि रुखवत साहित्याचे वितरण करण्यात आले.

सोहळा स्थळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. पाहुण्यांसाठी चपाती, भाजी आणि बुंदीचा लाडू असे भोजन देण्यात आले. तसेच खुल्या बग्गीतून काढलेली वधू-वरांची मिरवणूक हा सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरली. सनई-चौघड्याच्या निनादात ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

यंदाच्या सोहळ्याला ‘जिल्हा पर्यटन थीम’ची विशेष झळाळी मिळाली. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे, सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि पर्यटन स्थळांची माहिती देणारे पॅनेल्स आणि स्टॉल्स मैदानात उभारण्यात आले होते. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती विशेष आकर्षण ठरली. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” या संदेशाने उपस्थितांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.

या सोहळ्याला धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्यांना आशीर्वाद दिला. पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार विजयकुमार देशमुख, मठांचे मान्यवर महाराज मंडळी तसेच रोहिणी तडवळकर, राम जाधव आदींची उपस्थिती विशेष ठरली. सर्व मान्यवरांचा लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी सत्कार केला.

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनीही या सोहळ्याला विशेष भेट देऊन नवदांपत्यांना आशीर्वाद दिला. परस्पर समजूतदारपणाचे आणि सहजीवनाचे महत्त्व त्यांनी दांपत्यांना समजावून सांगितले. आमदार सुभाष देशमुख यांनी राज्यपालांचा सत्कार करून स्वागत केले.

४६ सोहळे, ३२०५ विवाह, सर्वधर्मीय एकता, सामाजिक बांधिलकीचा हा सोहळाआज सोलापूरची ओळख बनला आहे. या संपूर्ण उपक्रमामागील विचार, कष्ट आणि सातत्य हे सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाचे विशेष प्रतीक मानले जाते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *