“लोकसेवेचा लोकजागर” ग्रंथाच्या निमित्ताने…
मुंबई दि ४ : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधिमंडळात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,त्यात इतर कार्यक्रमासोबत लोकसेवेचा लोकजागर या निलेश मदाने लिखित आणि संपादित विशेष ग्रंथाचे प्रकाशन ही महत्त्वपूर्ण घटना आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने विधिमंडळात झालेल्या अनेक भाषणे, घटनांची दखल घेण्यात असल्यानेे दर्दी वाचकांना यामुळे एक वैचारिक खाद्य मिळेल हे निश्चित.
या ग्रंथाच्या निमित्ताने विधिमंडळात जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मदाने यांनी लिहिलेली प्रस्तावना इथे वाचकांच्या सोयीसाठी पुन्हा देत आहे. याने या ग्रंथातील माहिती अधिक ठळकपणे दिसून येईल.
……
अगोदर 12 वर्षे सक्रीय पत्रकारीता केल्यानंतर निलेश मदाने सन-2004 मध्ये विधानमंडळ जनसंपर्क अधिकारीपदी रुजू झाले. विधानमंडळाचा अमृतमहोत्सव सन 2011-2012, नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांसाठी संसदीय अभ्यासवर्ग, संसदीय कार्यप्रणालीतील बलस्थानांविषयी लेखन, व्याख्याने, माननीय पीठासीन अधिकारी यांच्यासाठी टिपण, स्वीय सहायकांसाठी लोकसंपर्कासाठीची पुस्तिका आणि विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात होणारे सर्व महत्वाचे कार्यक्रम यात त्यांनी जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडलेली आहे. महत्वपूर्ण संदर्भ, कार्यवृत्तातील चर्चा, काही राजकीय घटना या विषयावर त्यांचे सातत्याने लेखन सुरु असते. या सर्व गोष्टींचे चांगल्याप्रकारे दस्तावेजीकरण व्हावे असा त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु असतो. त्यातूनच लोकसेवेचा लोकजागर या ग्रंथाची संकल्पना साकार झाली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळात आयोजित विशेष कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या संदर्भसमृध्द ग्रंथाचे प्रकाशन झाले. या ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वाटचालीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासमिती समोर केलेले महत्वपूर्ण भाषण, विधानमंडळ नागपूर अधिवेशनातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्तचा अभिवादन प्रस्ताव, मराठवाडा मुक्ती संग्रामाची 75 वर्षे, मा.पीठासीन अधिकारी यांचे मनोगत-मंथन तसेच सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन -2026 सुरु असल्याने मा.मुख्यमंत्री महोदय यांचे अर्थसंकल्प सोप्या भाषेत उलगडून सांगणारे अभ्यासपूर्ण पुस्तक, तत्कालीन माननीय उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अतिरिक्त अर्थसंकल्पावरील महत्वपूर्ण भाषण असे सारे महत्वाचे संदर्भ विधिमंडळाचे सन्माननीय सदस्य, स्वीय सहायक, पत्रकार, राज्यशास्त्राचे अभ्यासक यांना एकाच दृष्टीक्षेपात वाचायला मिळत आहेत. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक (अ.का.) निलेश मदाने यांनी जनसंपर्क अधिकारी, विधान भवन तसेच माननीय सभापती महोदय यांचे जनसंपर्क अधिकारी या जबाबदाऱ्या सांभाळत अतिशय मेहनतीने हा लोकसेवेचा लोकजागर ग्रंथ सिध्द करुन वाचकांच्या हाती दिला आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या याअगोदरच्या प्रकाशनांप्रमाणेच हे प्रकाशन देखील सर्वांना उपयुक्त ठरेल असे आहे, यात शंका नाही.ML/ML/MS