​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विकासाच्या दूरदृष्टीसह सुशासनाचा आदर्श घालून देणारे व्यक्तीमत्व

 ​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विकासाच्या दूरदृष्टीसह सुशासनाचा आदर्श घालून देणारे व्यक्तीमत्व

मंगलप्रभात लोढा

भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या राष्ट्रनिर्माणाच्या ऐतिहासिक प्रक्रियेत महाराष्ट्राचे अमूल्य योगदान असेल यात मला कोणतीही शंका नाही. लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राचे नेतृत्व असल्यानेच हे शक्य होणार आहे. फडणवीस यांच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळेच राज्याचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न मूर्त स्वरूपात जनतेला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या मंत्री मंडळात मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव म्हणजे विकासाची दूरदृष्टी आणि समाजकारणाचा ठेवा आहे असे मी मानतो.

देवेंद्रजी कसलेले राजकारणी तर आहेतच त्याचबरोबर तितक्याच आत्मीयतेने जनतेच्या सेवेसाठी प्रशासनावर जबरदस्त पकड असणारे, सुशासनाचा आदर्श घालून देणारे, जनतेला लोकाभिमुख सेवा देणारे मुख्यमंत्री आहेत. कणखर बाण्याच्या या दृढनिश्चयी व्यक्तिमत्वाचा २२ जुलै रोजी जन्मदिन असून त्यांना माझ्या मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजनरी नेतृत्व आहे. राज्यकारभारात अत्यत जटील प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात विविध विभागाच्या कामगिरीचा आढावा त्यांनी घेतला. यात प्रशासकीय मूल्यमापन करण्याचा धाडसी निर्णयही त्यांनी घेतला. विभागांना जाहीररीत्या मूल्यांकन त्यांनी दिले. या निमित्ताने सरकारच्या कारभाराची जनतेत चर्चा होईल, याची जराही भीती फडणवीस यांनी बाळगली नाही. केवळ सकारात्मक परिणाम साधण्यासाठी तसेच तत्परतेने प्रशासकीय काम करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत त्यांनी हा नवा पायंडा त्यांनी घालून दिला.

जनतेच्या हितासाठी धाडसी निर्णय घेणे हा फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा पैलू यातून स्पष्ट होतो.
माझ्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता या विभागावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. केवळ शहरी भागातच नाही. तर ग्रामीण तरुणांनाही स्टार्ट अप्सच्या माध्यमाने उज्जवल भविष्य देण्याचा त्यांचा मानस आहे. महाराष्ट्रभरातील स्टार्ट अप सुरु करू इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांसाठी एकात्मिक सुविधा केंद्र सुरु केले जाणार आहे.देशात सर्वाधिक २८ हजार स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत यामध्ये महिला स्टार्टअप्सची संख्याही देशात अग्रेसर आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी ५२ महिलांना २ कोटी ३४ लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे​ आणि त्यामध्ये वारंवार वाढच होत आहे.​ मुंबईतील चांदिवली अल्पसंख्यांक शासकीय औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण संस्था येथे नियोजित इमारतीचा आराखडा तयार करण्यात येत आहे. ही नियोजित वस्तू भारतातील एकमेव आणि अद्वितीय केंद्र म्हणून नावारूपाला येऊन महाराष्ट्रात स्टार्ट अप संस्कृती रुजवण्यास मदत होणार आहे.राज्यात २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. देशातील पहिली इनोव्हेटिव्ह सिटी महाराष्ट्रात उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

गिफ्ट सिटीच्या धर्तीवर नवी मुंबई येथे ५०० कोटी खर्च करून २५० एकर मध्ये अत्याधुनिक हाय टेक सुविधायुक्त सिटी निर्माण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी नाविन्यता विभाग युद्धपातळीवर कार्यरत असून मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य यात लाभत आहे. सिंगापूर येथील आयटीई एज्युकेशन सर्व्हिसेस ( ITEES ) या संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्रात जागतिक कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याची योजना कौशल्य विभागाने आखली आहे.

जागतिक दर्जाचा कौशल्य विकास साधत महाराष्ट्रातील तरुणांना जागतिक रोजगाराच्या संधी या योजनेमुळे उपलब्ध होणार आहेत. यातही मुख्यमंत्री फडणवीस यांचे सहकार्य लाभत असून लवकरच अत्याधुनिक ट्रेड्स सह हे जागतिक कौशल्य विकास केंद्र उभे राहील,याची मी निसंकोचपणे ग्वाही देतो.

कौशल्य विकास विभागाकडून महत्वकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येत असून सुरूअसलेल्या या योजनेत सद्य स्थितीत १ लाख ५० हजार विद्यार्थी कार्य प्रशिक्षण घेत आहेत. नुकताच कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांवरून ११ महिन्यांचा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील १८ ते ३५ वयोगटातील युवकांना विविध महामंडळे, उद्योग आणि आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार, आयटीआय किंवा पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवी / पदव्युत्तर प्राप्त प्रशिक्षणार्थींना १० हजार रुपये विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे.

कौशल्य विभागाच्या या महत्त्वपूर्ण योजनेत मुख्यमंत्र्यांचे अमूल्य योगदान आहे. आतापर्यंत या योजनेवर ४८१ कोटी इतके रूपये खर्च झाले आहेत. केवळ एका विभागापुरतेच नाही तर राज्यातल्या प्रत्येक विभागातल्या विविध योजनांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस स्वतः लक्ष घालून योजना सुसूत्रपणे जनतेपर्यंत कशी पोहोचेल याची काळजी ते घेतात. ​कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयातंर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांतर्गत माहे डिसेंबर, 2024 ते मे, 2025 या कालावधीमध्ये विविध योजनांद्वारे एकूण 1,34,303 उमेदवारांना रोजगार प्राप्त झालेला आहे.​ कौशल्य विभागाच्या अंतर्गत राज्यात 203 रोजगार मेळावे संपन्न झालेले असून यामध्ये 2492 उदयोजकाद्वारे 1,20,572 रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली. सदर रोजगार मेळाव्यात 63,441 उमेदवार सहभागी झाले​. त्यापैकी 23,854 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे.​

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात या विभागाचे काम सुसूत्रपणे अविरत सुरु आहे. पंखांना बळ देण्याची ​त्यांची भूमिका राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल यात मला तसूभरही शंका नाही.
​मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय पातळीवरही विविध योजनांचा पाठपुरावा करून कौशल्य विभागाला अधिक सक्षम करत आहेत. यापैकीच एक योजना आहे ‘मॉडेल करिअर सेंटर’ ग्रामीण तसेच निमशहरी भागातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी, पारदर्शीरित्या व प्रभावी पध्दतीने तंत्रज्ञानाच्या सहायाने समुपदेशन आणि प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत मॉडेल करिअर सेंटर ही योजना सुरु करण्यांत आलेली आहे. ​

केंद्र शासनाच्या रोजगार व प्रशिक्षण महानिदेशालय तसेच श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत “राष्ट्रीय करीयर सेवा”
(National Career Service) ही योजना मंजुर करण्यात आलेली आहे. डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत 1,26,482 उमेदवारांची नोंदणी झाली असून 62,862 उमेदवारांचे समुपदेशन करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रही कौशल्य विकासाच्या माध्यमाने या संकल्पात आपले योगदान देत आहे.

विविध रोजगार मेळावे,मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना,प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना,दिनदयाळ अंत्योदय योजना,आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र तसेच आयटीआय,रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ,राज्य नाविन्यता सोसायटी,कौशल्य विकास आयुक्तालय यांच्यामार्फत यासह विविध रोजगाराच्या योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत सुरू करण्यात आल्या​. या योजनांमुळे युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून हा फार मोठा सामाजिक बदल दिसून येत आहे. युवकांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण मिळाल्यामुळे भविष्यात समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उर्मी तरुणांमध्ये जागृत होत आहे. जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण तरुणांना देशातच नाही तर विदेशातही रोजगाराच्या संधी मिळवून देत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यकारभार करण्यात जसे पारंगत आहेत. तसेच त्यांची पक्षावरही निष्ठा आहे. पक्षाची ध्येय धोरणं राबवण्यात ते मागे राहत नाहीत. मोठ्या पदावर असूनही आपल्यातला कार्यकर्ता ​त्यांनी जिवंत ठेवलाय. अनेकदा राजकीय स्थित्यंतरे हा राजकारणाचा अविभाज्य भाग असतो. अशाच एका स्थित्यंतरतून ३० जून २०२२ मध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदें यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाचा सलग पाच वर्षाचा दीर्घ अनुभव, सर्वाधिक आमदारांचे पाठबळ आणि सक्षम नेतृत्वगुण अंगी असतानाही त्यांनी पक्षाचा आदेश पाळत, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पक्षाच्या अनुशासनाची प्रचिती साऱ्या जगाला करून दिली. व्यक्ती मोठी नाही तर पक्ष मोठा हा संस्कार त्यांनी आपल्या कृतीतून कार्यकर्त्यांवर केला,असे अनुशासित मुख्यमंत्री सर्वसमावेशक नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे.

महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणाऱ्या या कर्तृत्वान, दूरदृष्टीच्या नेत्याला आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो, ही त्यांच्या जन्मदिनी सदिच्छा व्यक्त करतो.

मंगल प्रभात लोढा

मंत्री, कौशल्य रोजगार,
उद्योजकता व नाविन्यता,
महाराष्ट्र राज्य

ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *