कालचे कबुतरखान्याचे आंदोलन चुकीचे, आरोग्याचा प्रश्न महत्वाचा….

मुंबई दि ७– उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कबुतरे आरोग्यासाठी घातक आहेत , त्यामुळे नागरिकांचे आरोग्य जास्त महत्वाचे आहे, त्या पार्श्वभूमीवर काल दादर इथे झालेले कबुतरखान्याचे आंदोलन चुकीचे होते, मात्र त्यात जैन समाज नव्हता , त्यात दुसरेच कोणी घुसले होते असे मत कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले आहे.
आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर आपली मते मांडली. कबुतर हा आपले अन्न स्वतः शोधू शकत नाही, त्याला खायला द्यावे लागते, त्यामुळे ज्या ठिकाणी लोकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी त्यांच्यासाठी कबुतरखाने उभारण्यात यावेत असे आपले मत आहे. आपण कधीही नागरिकांच्या आरोग्याबाबत तडजोड केलेली नाही. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आपण सर्व जण बांधिल आहोत असेही लोढा यावेळी म्हणाले.
आपल्या पाठिंब्याने जैन समाज आंदोलन करीत आहे किंवा या विषयाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे असे म्हणणे चुकीचे आहे असा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला. कालच्या आंदोलनात जैन समाजाने पुढाकार घेतला नव्हता तर इतरच कोणी त्यात सहभागी झाले होते असेही लोढा यांनी सांगितले. ML/ML/MS