लालकृष्ण आडवाणी यांना ‘ भारतरत्न ‘ जाहीर

 लालकृष्ण आडवाणी यांना ‘ भारतरत्न ‘ जाहीर

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

पंतप्रधानांनी लिहिले आहे की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारत देशाची सेवा करण्याचे काम केले. केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे, त्यांची भाषणे आमच्यासाठी दिशादर्शक आणि समृद्ध असा अनुभव देणारी ठरली आहेत.

भाजपचे भीष्म पितामह अशी ओळख असलेले ९६ वर्षीय आडवाणी यांना २०१५ मध्ये देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अयोध्येत उभ्या राहिलेल्या राम मंदिरासाठी त्यांनीच आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. त्यानंतरच या आंदोलनाला वेग आला.

पाकिस्तानातील कराची इथं लालकृष्ण आडवाणी यांचा ८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्म झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात दाखल झालं. १९८६ ते १९९१ या काळात आडवाणी तीन वेळा भाजपचे अध्यक्षपद सांभाळले. ते चार वेळा राज्यसभा खासदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार राहिले आहेत. १९७७ ते १९७९ या काळात ते पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले, यावेळी त्यांच्याकडं माहिती व प्रसारण मंत्रालयाचा कारभार होता. त्यानंतर १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या पहिल्या सरकारमध्ये ते गृहमंत्री बनले तर २९ जून २००२ मधील दुसऱ्या वाजपेयी सरकारमध्ये उपपंतप्रधान बनले.

दरम्यान २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला रामजन्मभूमी आंदोलनाचे कर्तेधर्ते असलेले आडवाणी प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. गेल्या कित्येक काळापासून ते सक्रिय राजकारणापासूनही दूर आहेत. त्यामुळे भाजपने आडवाणींना दुर्लक्षित केल्याच्या उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर आता भाजपचे पहिले सरकार सत्तेत आणण्यात मोलाचे योगदान असणारे आडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब जाहीर झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

SL/KA/SL

3 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *