साहित्याचे सरकारीकरण होऊ नये याचे भान राखा

 साहित्याचे सरकारीकरण होऊ नये याचे भान राखा

वर्धा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ” महाराष्ट्र शासनाने नुकतेच विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. साहित्य संमेलन घेणे हे सरकारचे काम नाही. सरकारने साहित्य संमेलन भरवणे ही कल्पना कोणत्याही स्वतंत्र देशाला आणि स्वतंत्र समाजाला मानवणारी नाही. सरकारी साहित्य संमेलनांमुळे यथावकाश साहित्याचे सरकारीकरण होऊ शकते. साहित्याचा संसार गरिबीत राहिला तरी चालेल, पण तो सरकारच्या नियंत्रणात जाऊ नये, याचे भान साहित्य संस्था आणि साहित्यिकांनी राखले पाहिजे,  असे परखड प्रतिपादन  96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात केले.

वर्धा येथे आजपासून सुरु झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी अत्यंत संयत पण परखड शब्दात मराठी साहित्य संमेलनातील सरकारी हस्तक्षेपाबद्ल नाराजी व्यक्त केली तसेच सरकारवरील अवलंबित्वाबाबत साहित्याशी निगडीत संस्थांचीही कानउघाडणी केली.  यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकानाथ शिंदे, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, प्रसिद्धी हिंदी कवी डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास उपस्थित होते.

साहित्य संस्थांची कानउघाडणी

शासकीय अनुदान न घेता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित करता यावीत म्हणून एक अधिकोषही निर्माण केला. त्यातही आपण लक्षणीय भर टाकू शकलेलो नाही. आणि जमलेल्या निधीतून सध्याच्या पद्धतीनुसार आयोजन करायचे म्हटले तर एकही संमेलन घेता येणार नाही, अशा शब्दात चपळगावकरांनी साहित्य संस्थांचे कान टोचले.

सरकारवरील अवलंबित्व साहित्यसंस्कृतीसाठी घातक 

आपला साहित्य व्यवहार दिवसेंदिवस खर्चिक होत चालला आहे. साहित्य संमेलनाचा खर्च जसजसा वाढत आहे तसतसे अगतिकपणे शासनावरचे अवलंबित्व वाढत चालले आहे. कल्याणकारी शासन या संकल्पनेने हळूहळू समाजाची स्वयंसेवी वृत्ती आणि उपक्रमशीलताच नष्ट होत चालली आहे. याचा परिणाम समाजाच्या स्वायत्ततेवर होणारच आहे. हे वास्तव लक्षात घेऊन आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे न्या. चपळगावकर यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाचा समारोप रविवार (5 फेब्रुवारी) रोजी होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, दत्ताजी मेघे, संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांची उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान वर्षीप्रमाणे यावर्षी देखील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्यिक कमी आणि राजकीय व्यक्तिमत्वच जास्ती हे नेहमीचेच चित्र दिसून येत आहे. यंदाचे संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी केलेल्या परखड प्रतिपादनानंतर आता साहित्य क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेप आणि साहित्य संस्थांचे सरकारवरील परावलंबित्व कमी होणार का याचे उत्तर मिळण्यासाठी आता पुढील वर्षीच्या साहित्य संमेलनाचीच वाट पहावी लागेल, एवढ निश्चित.

SL/KA/SL

3 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *