जगातील सर्वांत सुरक्षित देशांची यादी जाहीर

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025 ने जगातील सर्वात सुरक्षित देशांची एक नवीन यादी जाहीर केली आहे, यामध्ये विशष बाब म्हणजे यामध्ये पाकिस्तानने भारताला मागे टाकून वरचे स्थान मिळवले आहे. नुम्बेओने जाहीर केलेल्या ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025 मध्ये पाकिस्तान 65 व्या क्रमांकावर आहे तर भारत 66 व्या क्रमांकावर आहे. सुरक्षेच्या बाबतीत अनेकदा अव्वल देशांमध्ये स्थान मिळवणारा अमेरिका या यादीत 89 व्या क्रमांकावर आहे.
या यादीत अँडोराने 84.7 गुणांसह सर्वात सुरक्षित देश म्हणून पहिले स्थान पटकावले आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती (84.5), कतार (84.2), तैवान (82.9) आणि ओमान (81.7) यांचा क्रमांक लागतो. मजबूत सुरक्षा व्यवस्था, कमी गुन्हेगारी दर आणि चांगल्या राहणीमानामुळे हे देश या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत.
हे रँकिंग वेगवेगळ्या देशांतील नागरिकांनी केलेल्या सुरक्षा सर्वेक्षणावर आधारित आहे. यामध्ये दिवसा आणि रात्री लोक त्यांच्या सुरक्षिततेबद्दल किती समाधानी आहेत हे दिसून आले. याव्यतिरिक्त चोरी, शारीरिक हल्ला, छळ, भेदभाव आणि इतर हिंसक गुन्ह्यांचे दर देखील समाविष्ट आहेत. जगभरातील सुरक्षिततेची भावना नेहमीच सरकारने सादर केलेल्या आकडेवारी आणि माहितीपेक्षा वैयक्तिक अनुभव आणि भावनांवर आधारित असते, हे या यादीतून स्पष्ट होते.