अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

 अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली अशा ओळी उधृत करीत शरद पवार यांनी पक्षकर्त्याना पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे, आपल्या पक्षाचे चिन्ह जाणार नाही, ते जाऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने बोलावलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील मेळाव्याला ही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठी गर्दी केली होती. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे , एकनाथ खडसे आदी नेत्यांनी भाषणे करीत अजित पवार गटावर टीकेची झोड उठवली आणि शरद पवारांचे नेतृत्वच देशाला दिशा देऊ शकेल असे म्हटले.

शिवसेनेचे हिंदुत्व अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे तर भाजपचे हिंदुत्व विखारी , देशविघातक आणि देशात फूट पाडणारे आहे त्यामुळे त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. जे या विचारांशी द्रोह करून गेले त्यांनी पक्षाशी कोणतीही चर्चा केली नव्हती. मात्र आपले त्यांच्याबद्दल काही म्हणणे नाही, माझा लोकांवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे ते यावर योग्य निर्णय देतील असे शरद पवार यावेळी म्हणाले.

भाजपा सोबत गेलेल्या सर्व पक्षांना आजवर त्यांनी संपविण्याचेच प्रयत्न केले गेला. अकाली दल , शिवसेना , तेलगू देशम आदी त्याची मोठी उदाहरणे आहेत. एकीकडे आपल्याला विठ्ठल म्हणायचे आणि दर्शनाला भलतीकडेच जायचे असे प्रकार सुरू आहेत. माझा फोटो लावल्याशिवाय त्यांचे नाणे खणखणीत वाजूच शकत नाही अशी बोचरी टीका शरद पवार यांनी यावेळी केली.

आपण पुलोद सरकार स्थापन केले हे खरे आहे मात्र तेव्हा भाजपा पक्ष नव्हता सगळे पक्ष विसर्जित करून जनता पक्ष स्थापन केला होता त्याचे ते सरकार होते , नागालँड मध्ये आपल्या आमदारांना भाजपा सरकारला पाठिंबा द्यायला सांगितला त्याचे कारण देशहित आहे. एकीकडे चीन तर दुसरीकडे पाकिस्तान तो भाग गिळंकृत करण्यास तयार आहे म्हणून तिथली वेगळी परिस्थिती पाहून तो निर्णय घेतला आहे मात्र फक्त बाहेरून पाठिंबा दिला आहे असे शरद पवार म्हणाले.

आज देशभरात अघोषित आणीबाणी लादली गेली आहे, विरोधी पक्षच नव्हे तर भाजपाच्या वरिष्ठांकडून खासदारांशी देखील संवाद राहिलेला नाही. त्यामुळे अशा विचारांचे सरकार सत्तेवरून दूर करण्याचे काम आपण करायला हवे असेही पवार यावेळी म्हणाले.

ML/KA/SL

5 July 2034

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *