धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे परवाने रद्द करावे
मिरा-भाईंदर, दि. ६ :– व्यवसाय वृद्धीच्या नादात समाजातील मुलभूत मूल्ये पायदळी तुडवत, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व धर्मांध स्वरूपाच्या जाहिरातींमार्फत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रकार करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करून त्यांच्या बांधकाम परवान्यांवर गंडांतर आणावे, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी दिले आहेत.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे–घोडबंदर येथील सर्वे क्र. २६/२, ३ व २७/१० या जमिनीवरील सदनिकांच्या विक्रीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या निंदनीय प्रकाराची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री सरनाईक यांनी महापालिका प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
त्याअनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने संबंधित विकासकाकडे तातडीने खुलासा मागविला असून, खुलासा असमाधानकारक आढळल्यास त्यांचा बांधकाम परवाना रद्द करण्याची कठोर कारवाई केली जाईल, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.