सोनम वांगचूक यांच्या पत्नीचे राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र

नवी दिल्ली, दि. ३ : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली अँगमो यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची विनंती केली आहे. लडाखमधील जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या आदिवासी पार्श्वभूमीचा उल्लेख करत त्यांनी वांगचूक यांच्या विनाशर्त सुटकेची मागणी केली आहे.
हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही पाठवण्यात आले असून, अँगमो यांनी नमूद केले आहे की वांगचूक यांनी हवामान बदल, आदिवासी भागांचा विकास आणि शैक्षणिक सुधारणांसाठी शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करणे अन्यायकारक आहे.
लडाखला सहाव्या अनुसूचीचे संरक्षण आणि राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर वांगचूक यांना अटक करण्यात आली. त्यांना NSA च्या कलम ३(२) अंतर्गत ताब्यात घेऊन जोधपूर सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले आहे. अँगमो यांनी सांगितले की, अटकेनंतर पतीशी संवाद साधण्याची संधीही मिळाली नाही.
अँगमो यांच्या म्हणण्यानुसार, अटकेदरम्यान वांगचूक यांना स्वतःचे कपडे घेण्याची परवानगी दिली गेली नाही आणि उपोषणामुळे त्यांची प्रकृती कमकुवत झाली आहे. त्यांना आवश्यक औषधे आणि सुविधा मिळत आहेत की नाही, याबाबतही अनिश्चितता आहे. शिवाय, त्यांच्या संस्थेवर नजर ठेवली जात असून, काही कर्मचाऱ्यांना कोणत्याही अधिकृत आदेशांशिवाय ताब्यात घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पत्रात अँगमो यांनी विचारले आहे की, पर्यावरण, शिक्षण आणि सामाजिक नवकल्पनांबाबत शांततापूर्ण आंदोलन करणे हा गुन्हा मानला जावा का? त्यांनी राष्ट्रपतींना त्यांच्या आदिवासी पार्श्वभूमीचा उल्लेख करत लडाखमधील जनतेच्या भावना समजून घेण्याचे आवाहन केले आहे.
अखेरीस, त्यांनी राष्ट्रपतींना विनंती केली आहे की, सोनम वांगचूक यांची विनाशर्त सुटका करून न्याय दिला जावा.
SL/ML/SL
3 Oct. 2025