सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित या समारंभात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, शासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निसार तांबोळी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव, माहिती महासंचालक जयश्री भोज यांच्यासह वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी, विविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
उपस्थितांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गाऊन ध्वजाला मानवंदना दिली. सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राज्यपाल बैस यांनी यावेळी आपल्या भाषणात जगभरातील मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडल्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबरोबरच महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा अनेक विभूतींनी महाराष्ट्राला सामाजिकदृष्ट्या समृद्ध केल्याचा त्यांनी उल्लेख केला.
राज्यपाल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. यानिमित्ताने 2 ते 9 जून 2023 या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय पुण्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शासनाने 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.
ML/KA/SL
1 May 2023