विधानसभेला झाला लक्षवेधी सुचनांचा भार
नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सगळ्या सदस्यांना बोलू देण्याच्या उद्देशाने आणि आपल्या मतदार संघाचे प्रश्न मांडण्यासाठी अनेक आयुधांपैकी एक असलेल्या लक्षवेधी सूचना असंख्य प्रमाणात घेण्यात आल्या , मात्र त्यातील अनेक आयत्यावेळी आल्याने त्याला उत्तर देण्याची संधी ही अधिकाऱ्यांना मिळू शकली नाही. परिणामी अनेक केवळ अल्प उत्तरात गुंडाळल्या तर काही शिल्लक राहिल्या.
यातील आज सकाळी विशेष सत्रात झालेल्या या लक्षवेधी..
- राज्यातील आदिवासींचे होणारं स्थलांतर रोखण्यासाठी नाबार्ड च्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, दरवर्षी चारशे लाभार्थी निवडून त्यांना लाभ दिला जात आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश पाडवी यांनी उपस्थित केली आहे.
स्थानिक उत्पादनांसाठी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येत आहेत , शबरी आवास योजनेच्या अंतर्गत जितके अर्ज येतील तितके मंजूर करण्यात येतील, यावर्षी ८५ हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं. - अकोला इथे सध्या असलेल्या विमानतळाची धावपट्टी अडीच किमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, त्यासाठी आवश्यक सुधारित अहवाल आल्यावर भू संपादन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती प्रभारी मंत्री दीपक केसरकर यांनी दिली, याबाबतची लक्षवेधी रणजित सावरकर यांनी उपस्थित केली होती.
राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यावर त्यांचा व्यवहार्यता अहवाल देईल त्यानंतर भू संपादन केलं जाईल असंही केसरकर म्हणाले. अजित पवार यांनी ही हे काम तातडीने झालं पाहिजे अशी आग्रही मागणी केली. जानेवारी महिन्यात याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असं मंत्री म्हणाले. - मुंबईतील आदिवासी पाड्यांवर असलेले प्रश्न सोडवण्यासाठी जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष भेट दिली जाईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली. ही लक्षवेधी रवींद्र वायकर यांनी उपस्थित केली होती, सुनील राणे यांनी उप प्रश्न विचारले.
- नवी मुंबई नैना क्षेत्रातील विकास कामे आणि पायाभूत सुविधांसाठी तिथे एकत्रित विकास नियमावली लागू करण्यासाठी बैठक जानेवारीत घेतली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली. प्रशांत ठाकूर यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती.
- परभणीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत कच्छवा यांना त्यांच्या गैर कारभारासाठी तातडीने निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची घोषणा प्रभारी मंत्री तानाजी सावंत यांनी केली ,याबाबतची लक्षवेधी मेघना साकोरे बोर्डीकर यांनी मांडली होती.
- राज्यात अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी असलेली घरकुल योजना ओबीसींना ही लागू करण्यात येणार आहे अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली. ही लक्षवेधी बच्चू कडू यांनी उपस्थित केली होती.
ML/KA/SL
30 Dec. 2022