निकष बाजूला ठेऊन सरसकट मदत करा

 निकष बाजूला ठेऊन सरसकट मदत करा

मुंबई, दि.३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुष्काळ आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. परंतू शेतकरी विरोधी धोरण राबविणारे, पिक विमा कंपन्यांचे खिसे भरणारे सरकार कोणतीही ठोस मदत करण्याच्या मानसिकतेत नाही. शेतकऱ्याला दु:खाच्या दरीत ढकलून सत्ता टिकविण्यासाठी सरकारची आदळाआपट सुरू आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारे इतके बेजबाबदार सरकार कधी पाहिले नाही. अशा सरकारला शेतकरी नक्कीच धडा शिकवेल,असे खडे बोल सुनावत निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, सक्तीने कर्ज वसुली करू नये, वीज बील माफ करावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

भीषण दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष, कापूस, सोयाबीनसह इतर पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे वडेट्टीवार यांनी जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी जालना, बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण आढावा घेतला. त्याचबरोबर शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यानंतर कृषी विभागाचे अपरमुख्य सचिव अनुपकुमार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. त्यांना शेतकऱ्यांची व्यथा सांगितली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले, शेतकरी गारपीटमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकरी दुष्काळाचा देखील सामना करत आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्याला निकषात भरडून सरकारला काय साध्य करायचे आहे हा खरा सवाल आहे. शेतकरीविरोधी धोरण राबविणाऱ्या सरकारला स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्याला कर्जमुक्त केले पाहिजे. राज्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे. पण सरकार आपल्याच धुंदीत आहे.

वडेट्टीवार यांनी धारकल्याण गावात द्राक्ष बागायतदार सुंदर इंगोले यांच्या शेतात बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पीकविमा कंपन्याचे प्रतिनिधी नीट वागणूक देत नाहीत, गेल्या वर्षीचे पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. त्यानंतर त्यांनी पीकविमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आक्रमक भूमिका घेऊ असा थेट इशाराच त्यांना दिला. त्यानंतर कृषी विभागाचे अपरमुख्य सचिव अनुप कुमार यांना फोन केला. शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. गारपीट, अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. पीक विमा प्रतिनिधी शेतकऱ्यांशी उद्धट भाषेत बोलतात, अपमान करतात. पीकविमा कंपन्यांना समज द्या, असे वडेट्टीवार यांनी अनुपकुमार यांना सांगितले.

बुलडाणा येथील आसोला गावातील शेतकरी म्हणाले, आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.भीमराव मानटे यांचे घर उद्ध्वस्त झाले. छप्पर तुटले. जोरात आलेल्या वादळात कापूस, सोयाबीन नुकसान झाले असून अजून पंचनामे झाले नाहीत. मागील वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. पालकमंत्री फिरकले नाहीत. त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे.

शहीद अग्नीवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांची वडेट्टीवार यांनी भेट घेतली. राज्य सरकारने या कुटुंबाला फक्त १० लाख रूपयांची मदत दिली आहे. पंजाब सरकारने त्यांच्या राज्यातील अग्नीवीराला एक कोटी रूपयांची मदत केली. महायुतीच्या सरकारने एक कोटी का नाही दिले. असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. देशप्रेमाच्या गप्पा मारण्यापेक्षा अक्षय गवते यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

ML/KA/SL

30 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *