करंजा ते रेवस सागरी सेतूच्या पहिल्या फाऊंडेशनची पायाभरणी.

अलिबाग दि १७– रायगड जिल्ह्यातील उरण येथे रेवस रेड्डी महामार्गावरील महत्वाचा टप्पा असणाऱ्या धरमतर खाडीवरील करंजा ते रेवस सागरी सेतूच्या पहिल्या फाऊंडेशनचा पायाभरणी समारंभ करंजा समुद्र किनाऱ्यावर संपन्न झाला.
उरण तालुक्यातील करंजा ते
अलिबाग तालुक्यातील रेवस हे सागरी अंतर येत्या ३ वर्षात केवळ अर्ध्या तासात पार करता येणार आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील करंजा ते अलिबाग तालुक्यातील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. २९३६ कोटी रुपयांचे हे टेंडर अफकॉन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळाले असून कंपनी पुढील ३ वर्षात हे काम पूर्ण करणार आहे.
मुंबईतील अटल सागरी सेतूमार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात प्रवास करता येणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात या करंजा – रेवस पुलाच्या उभारणीसाठी कंबर कसली होती. सध्या रेवस-करंजा प्रवासासाठी वाहनधारकांना ७० किलोमीटर प्रवास रस्त्याने करावा लागतो. यासाठी दोन तासांचा अवधी लागतो, तर जलवाहतुकीसाठी दोन ठिकाणांदरम्यान १५ मिनिटे लागतात.
पूल झाल्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी जाणाऱ्या उरण, पनवेल तालुक्यातील हजारो प्रवाशांचा खर्च व वेळेची बचत होणार आहे. उरण येथून अवघ्या ३० ते ३५ मिनिटांत अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण गाठता येणार आहे.