ब्राह्मण समाजाविषयी द्वेष निर्माण करणारी व्यवस्था बंद व्हावी

मुंबई, दि. १८ : ब्राह्मण समाजाविषयी द्वेष निर्माण करणारी व्यवस्था बंद केली पाहिजे, असे आवाहन ‘उचल्या’ या कादंबरीचे लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी काल केले. श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या ‘चिवित्रा’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन गायकवाड आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले “समाजातील जातिव्यवस्था, वर्णभेद तसेच स्त्री-पुरुषातील असमानता यांसारख्या कालबाह्य आणि संकुचित विचारसरणीचे उच्चाटन करून साहित्यिकांनी समाजाला मानवतेच्या मार्गाकडे नेण्यासाठी दर्जेदार साहित्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. तेव्हाच मराठी साहित्याला जागतिक स्तरावर मान्यता आणि उंची प्राप्त होईल”. या कार्यक्रमाला श्रीविद्या प्रकाशनच्या श्रीती कुलकर्णी उपस्थित होत्या.
लक्ष्मण गायकवाड पुढे म्हणाले, ‘साहित्य केवळ रंजन करत नाही तर विचारांनाही दिशा देते. सभोवतालच्या अनुभवांचे डॉक्टर ओक यांनी केलेले लेखन त्यामुळेच वाचकांना समृद्ध व विचारांना चालना देणारे आहे. अशा प्रकारचे लेखन त्यांनी सातत्याने करत राहावे.’
गिरीश ओक म्हणाले, ‘लेखनाला लाभलेला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उत्साहवर्धक असतो. मान्यवर नाटकारांचे, साहित्यिकांचे शब्द सादर करताना होत असलेला आनंद आपणच लिहिलेल्या साहित्याचे अभिवाचन करताना अधिक द्विगुणीत होतो. हा अनुभव मोठा विलक्षण असतो.’ याप्रसंगी ओक यांनी पुस्तकातील ‘विंगभूमी’ या प्रकरणाचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी गोखले यांनी तर आभार देवीन कुलकर्णी यांनी मानले.