सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली, दि. ६ : सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. वरिष्ठ वकील राकेश किशोर (वय ७१) यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो बूट त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करून वकिलाला ताब्यात घेतले. सुरक्षारक्षकांनी राकेश किशोर यांना पकडल्यावर त्यांनी “सनातनचा अपमान सहन करणार नाही” अशी घोषणा दिली. ही घटना कोर्ट क्रमांक १ मध्ये घडली. घटनेनंतरही मुख्य न्यायमूर्ती गवई यांनी शांतपणे सुनावणी सुरू ठेवली.
घटनेनंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “या घटनेमुळे कोणीही विचलित होऊ नये. मी सुद्धा विचलित झालो नाही. अशा गोष्टींनी मला काही फरक पडत नाही.”
या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, या हल्ल्याचा संबंध मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्ती प्रकरणाशी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात या मूर्ती संबंधी याचिका दाखल करण्यात आली होती. सात फूट उंच भगवान विष्णूची शीर नसलेली मूर्ती हटवून नवी मूर्ती बसवावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र, सरन्यायाधीशांनी ही याचिका फेटाळली. तसेच, त्यांनी याचिकाकर्त्याला सांगितले, “तुमची तक्रार असेल तर तुम्ही भगवान विष्णूकडे जा.” या विधानावर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आणि काही व्यक्तींनी आक्षेप घेत सरन्यायाधीशांवर टीकाही केली होती. त्यानंतर सरन्यायाधीशांनी माझा अनादर करण्याचा हेतु नव्हता, मी सर्व धर्माचा आदर करतो असेही म्हंटले होते.
SL/ML/SL 6 Oct. 2025