दुप्पट पैसे आणि कर्ज फसवणुकीसाठी आता कायद्यात बदल आणि नवीन प्रणाली

नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नागरिकांना खोटी आमिषे दाखवून त्यांच्याकडून पैसे जमा करून दुप्पट , तिप्पट देणे , कर्जाच्या नावाखाली फसवणूक करणे अशा सर्व घटनांसाठी राज्य सरकार कायद्यात बदल करेल आणि त्यासोबतच एक नवीन प्रणाली विकसित करेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भातील दोन प्रश्नांच्या उत्तरात दिली.
ठेवी आणि कर्ज योजना देणाऱ्या जाहिराती कायद्याच्या कक्षेत आहेत का ते तपासणारी यंत्रणा गृह विभागाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत तयार केली जाईल असं ही त्यांनी सांगितलं. कायद्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक अभ्यास गट तीन महिन्यात तयार करण्यात येईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
सर्व प्रकारच्या बँका , वित्तीय संस्था, ॲप यांना समान पातळीवर आणून अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, केंद्र सरकार ही त्यासाठी कायद्यात बदल करत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. प्रशांत ठाकूर , नाना पटोले , रवींद्र वायकर, आशिष शेलार , जयंत पाटील, विकास ठाकरे , गणपत गायकवाड आदींनी उपप्रश्र्न उपस्थित केले होते.
राज्यात ओबिसींसाठी नवी वसतिगृहे
राज्यातील इतर मागास बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात येत्या जानेवारी पर्यंत ५२ वसतिगृहे सुसज्ज करून सुरू केली जातील अशी माहिती या खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
राज्यातील ९७७ ओबीसी समाजाच्या आश्रम शाळांची गेल्या तीन वर्षांची असलेली अनुदानाची थकबाकी १४१ कोटी रुपये इतकी होती ती गेल्या सरकारच्या काळातील आहे , आमच्या सरकारने आतापर्यंत १८० कोटी अनुदान रक्कम वितरित केली आहे. एकूण २२५ कोटी रुपये अनुदान देण्याची तयारी आहे असं ही सावे म्हणाले. रिक्त असलेली २८२ शिक्षक पदे भरती प्रक्रिया महिनाभरात सुरू करू असं ते म्हणाले. विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे , बाळासाहेब थोरात यांनी याबाबत प्रश्न विचारले होते.
कायम खंडित वीज पुरवठयासाठी नवी योजना
राज्यात ज्यांची वीज जोडणी थकाबकिपोटी कायमस्वरुपी खंडित केली आहे त्यांना पुन्हा जोडणी देण्यासाठी नवी सोपी योजना आणली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. मीटर रीडिंग न घेताच परस्पर बिले देण्याचा प्रकार जिथे झाला आहे त्यांना विशेष मोहीम राबवून नव्याने सुधारित बिले दिली जातील अशी माहिती त्यांनी दिली, विनोद निकोले , राजेश टोपे , सुनील भुसारा आदींनी हे प्रश्न उपस्थित केले होते.
ML/KA/SL
8 Dec. 2023