राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली, नागपूर घटना पूर्वनियोजित
 
					
    मुंबई, दि. १९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर मध्ये झालेल्या घटनेत ती पूर्वनियोजित होती हेच दिसून आलं , औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्यावर कोणतीही धार्मिक भावना भडकवणारे लिखाण नव्हतं असं स्पष्ट करीत पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कबरीतून शोधून काढून कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा झाली त्यातील गृहविभागाच्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्याची कायदा सुव्यवस्था स्थिती चांगली आहे, देशात गुन्ह्यांच्या प्रमाणात आपलं राज्य आठव्या क्रमांकावर आहे तर केवळ नागपूर शहर पहिल्या दहा क्रमांकाच्या आत आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. गुन्ह्यांचे आरोपपत्र साठ दिवसात सादर करण्याचं प्रमाण यावर्षी ९४ टक्क्यांवर पोहोचलं आहे, तर दोषसिद्धी चे प्रमाण यावर्षी पन्नास टक्क्यांवर गेलं आहे ते पंचाहत्तर टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राज्यानं स्वतःची AI मधील मार्वल ही प्रणाली विकसित केली आहे त्यातून गुन्हे रोखणे, शोधून काढणे आदी बाबी अधिक सोप्या होतील. सायबर गुन्हे फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत त्यासाठी १०४५ क्रमांकाची हेल्पलाइन तयार करण्यात आली आहे, त्यातून वेळेवर माहिती मिळाल्याने गेल्या वर्षी ४४० कोटी रुपये वाचवले आहेत. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यातही अंमली पदार्थ विरोधी पथके स्थापन करण्यात येत आहेत.
केंद्र सरकारने नागपूर इथे राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठाचे केंद्र नुकतेच मंजूर केलं आहे. सध्या राज्यात साडे दहा हजार पोलिसांची पदे रिक्त असून गेल्या तीन वर्षांत ३५, ८०२ पदांची नवीन भरती करण्यात आली आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हरवलेली ३८, ९१० मुलं त्यांच्या घरी पोहोचवण्यात आली आहेत अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
ML/ML/SL
19 March 2025
 
                             
                                     
                                    