पालकमंत्री दीपक केसरकरच्या हस्ते ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ या अभियानाचा शुभारंभ

 पालकमंत्री दीपक केसरकरच्या हस्ते ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ या अभियानाचा शुभारंभ

मुंबई दि.1( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईला सर्वात स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनविण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा निर्धार लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

तर राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास या खात्यांचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियानात सर्व मुंबईकरांनी आवर्जून सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

१ ते ३१ डिसेंबर या १ महिन्यांच्या कालावधीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ हे अभियान मोठ्या उत्साहाने व विविध स्तरिय बाबींचा अंतर्भाव करुन राबविण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान स्वच्छतेशी संबंधित विविध स्पर्धांचे आयोजन, स्वच्छता उपक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे,अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या उप आयुक्त श्रीमती चंदा जाधव यांनी दिली आहे.

मुंबई शहर भागातील ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या अभियानाचा शुभारंभ आज सकाळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दादर परिसरातील महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाच्या प्रांगणात झाला. तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम वांद्रे पूर्व परिसरातील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास या खात्यांचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह आमदार पराग अळवणी आणि मान्यवर उपस्थितीत होते. तर मालाड परिसरात आयोजित कार्यक्रमाला माननीय स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांची उपस्थिती लाभली. तसेच ‘एन’ विभागातील घाटकोपर परिसरात आयोजित अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमाला देखील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत शहर भागात राबविण्यात येणाऱ्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना केसरकर म्हणाले की,
मुंबई हे आर्थिक राजधानीचे शहर असल्याने देशभरातून लोक येथे येतात. त्यामुळे सार्वजनिक व्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी महानगरपालिकेवर असून, ते ती जबाबदारी योग्यप्रकारे पूर्ण करीत आहे.

तथापि, हे शहर स्वच्छ राखण्याची जबाबदारी केवळ महानगरपालिकेची नसून यासाठी लोकसहभाग देखील महत्त्वाचा आहे. यासाठी शासनाचे सर्व विभाग याकामी सहकार्य करतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी देत असलेल्या सुविधांचे त्यांनी कौतुक केले.

तसेच मुंबई शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत कोळीवाडे, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या परिसरांचे सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधांचा विकास यावर भर देण्यात येत आहे. मुंबईकरांना विविध प्रकारचे अन्नपदार्थ चाखायला मिळावेत तसेच सर्वसामान्यांना अधिक रोजगार मिळावा यासाठी दक्षिण मुंबईतील काही भागांत फूड कोर्ट निर्माण करण्यात येणार आहेत.

हे करीत असताना स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आजच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. केसरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांशी महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी आवर्जून संवाद साधला.
माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या अभियानाचा शुभारंभ आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये विविध ठिकाणी करण्यात आला. या शुभारंभ कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. तसेच याप्रसंगी जनजागृतीपर पथनाट्यांचे आयोजन देखील करण्यात आले होते.

SW/KA/SL

1 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *