मुंबई फेस्टिव्हलच्या लोगो आणि संकल्प गीताचे लोकार्पण

 मुंबई फेस्टिव्हलच्या लोगो आणि संकल्प गीताचे लोकार्पण

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्नाच्या प्रवेशद्वारात अर्थातच मुंबईत होणाऱ्या या फेस्टीव्हलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत २० ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या मुंबई फेस्टिव्हल 2024 कार्यक्रमाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते.

मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, काळा घोडा महोत्सवाच्या आयोजक ब्रिंदा मिलेरा, प्रख्यात संगीतकार शमीर टंडन आदी उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले की,नऊ दिवसीय महोत्सवामध्ये सर्वांना एकत्र आणण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव, संगीत, नृत्य आणि सिनेमा इव्हेंट्स, फूड फेस्टिव्हल सादर केले जातील. हा उत्सव मुंबईकरांच्या भावना आणि शहराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम एकत्र आणणारा आहे.

पर्यटनाला चालना देणे, विकास आणि सर्व समावेशकता जोपासणे तसेच उद्योगात नवीन संधी , मार्ग शोधणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ हा केवळ एक कार्यक्रम नाही; हा एक परिवर्तनकारी अनुभव आहे, जो भारताने पाहिलेल्या सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवांपैकी एक आहे. म्युझिक फेस्ट, अर्थ मुव्ही कॉन्टेस्ट, बीच फेस्ट, मुंबई वॉक, टुरिझम कॉन्क्लेव्ह, सिनेमा फेस्ट, क्रिकेट क्लिनिक, महा शॉपिंग फेस्ट, महामुंबई एक्स्पो या उपक्रमांचा या फेस्ट‍िव्हलमध्ये समावेश आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष महिंद्रा म्हणाले की, मुंबई फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील स्टेक होल्डर्स एकत्र येत असून हा फेस्टिव्हल एक वेगळा अनुभव देणारा आहे. या फेस्टिव्हलमुळे मुंबईच्या संस्कृतीचे एकत्रित दर्शन होईल. शिवाय सर्व मुंबईकरांना एकत्र आणण्यात या फेस्टिव्हलचा खूप मोठा वाटा असेल. ‘प्रत्येकजण आमंत्रित आहे,’ ही फेस्टिव्हलची संकल्पना अत्यंत समर्पक आहे.

मुंबईतील कला, संस्कृती, क्रीडा, फॅशन आणि बरेच काही एकत्र करून अनेक कार्यक्रमांद्वारे या अनोख्या उत्सवाचे साक्षीदार होता येणार आहे. हा फेस्टिव्हल केवळ एक कार्यक्रम नसून रसिकांसाठी हा अवर्णनीय आनंद असेल, असे महिंद्रा म्हणाले.

पर्यटन संचालक डॉ. पाटील म्हणाले की, मुंबईत विविध ठिकाणी मुंबई फेस्टिव्हलचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. इव्हेंट लाइन-अपमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्हायब्रंट म्युझिक फेस्ट, महा मुंबई एक्स्पो, मनमोहक सिनेमा, बीच फेस्ट, मुव्ही स्पर्धा आणि रोमांचक क्रिकेट क्लिनिक, स्टार्ट-अप फेस्ट अशा विविध आणि आकर्षक उपक्रमांचा समावेश आहे. मुंबई वॉक हे मुंबई फेस्टिव्हलच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईचे गतिचक्र कायम ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या डबेवाला, पोलिस हवालदार, बेस्ट बस ड्रायव्हर आणि कंडक्टर तसेच सफाई कामगार, सफाई कर्मचारी आदी मुंबईवीरांचा सत्कार करण्यासाठी शहरातील आयकॉन्स एकत्र येतील.

राज्य शासनाने विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा. लि. कंपनीकडे मुंबई फेस्टिव्हलचे संकल्पना आणि व्यवस्थापनेची धुरा सोपवली आहे. मुंबई फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे शॉप ॲण्ड विन फेस्टिव्हल. ज्यामध्ये एकाधिक रिटेल आणि डायनिंग आउटलेट्स तसेच मनोरंजनाच्या संधींचा समावेश असेल. यातील मेगा बक्षिसांमध्ये अनेकांची स्वप्ने सत्यात उतरतील. मुंबई मॅरेथॉन आणि काळा घोडा कला महोत्सव हे मुंबई महोत्सवाचे सहयोगी कार्यक्रम म्हणून भाग आहेत.

मुंबई फेस्टिवल २०२४ च्या घोषणेनंतर मुंबई फेस्टिव्हलचा लोगो, ‘सपनो का गेटवे’ या थीमचे लोकार्पण करण्यात आले, यानंतर संगीतकार टंडन यांनी रचलेल्या संकल्प गीताचे देखील लोकार्पण केले गेले. गाण्यातून मुंबईची असीमित ऊर्जा आणि विविधतेत नटलेल्या एकतेचे दर्शन घडून येते. चित्रपट आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी मुंबई फेस्टिव्हलच्या गाण्याला हुक स्टेप्स दिलेल्या  'संकल्प गीताचे' यावेळी सादरीकरण करण्यात आले.

ML/KA/SL

23 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *