स्व. प्रभा अ. मराठे सामाजिक सेवा पुरस्कार दरवर्षी

अमरावती, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दै. हिंदुस्थानच्या आधारवड स्व. प्रभा अरुण मराठे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त २८ सप्टेंबर रोजी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी त्यांच्या स्मृती दिनाला सामाजिक सेवा पुरस्कार दिला जाणार आहे असे दै. हिंदुस्थानचे व्यवस्थापकीय संपादक विलास अ. मराठे यांनी आज सांगितले. हा पुरस्कार या वर्षी स्व. प्रभा अ. मराठे यांच्या प्रथम स्मृतिदिनाला घोषित केला जाणार आहे.
या मागची भूमिका सांगताना विलास मराठे यांनी सांगितले की, स्व. प्रभा मराठे या केवळ दै. हिंदुस्थान परीवाराच्या आधारस्तंभच नव्हत्या तर त्या मोठ्या प्रमाणात सामाजिक भान जपत होत्या . हिंदुस्थान परीवाराच्या भरभराटीकरीता लोकसंग्रह वृद्धींगत करणे आणि स्वतःच्या वागण्यातून सकारात्मक जीवनाचा आदर्श निर्माण करणे हे कार्य त्यांनी सतत केले. कायम हास्यमुद्रेने प्रत्येकाचे स्वागत करणे तसेच केलेल्या कामाची शाबासकी देऊन पावती देणे हे कार्य देखील स्व. प्रभा मराठे यांनी सदोदित केले.
एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत जगणाऱ्या आजकालच्या जगात प्रत्येकाचे भरभरून कौतुक करून त्याच्या कामाचा उत्साह वाढविणे हे कार्य स्व. प्रभा मराठे यांच्या जीवनाचे ब्रीद होते. दै. हिंदुस्थान हे केवळ वृत्तपत्र न राहता सामाजिक बांधिलकी जपणारी एक चळवळ असावी हा त्यांचा कायम आग्रह असे. म्हणूनच वृत्तपत्रासोबत दिवाळी अंकासारखे उपक्रम सुरु करून विविध लेखकांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ त्यांनी मिळवून देण्यात कायम आग्रही भुमिका घेतली. त्यांचा हा सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे चालविण्याकरीता त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात आपले आयुष्य समर्पित करून दीन दुबळ्या आणि निराधार लोकांकरीता कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांपैकी एका संस्थेला हा स्व. प्रभा अ. मराठे सामाजिक सेवा पुरस्कार देण्याचे मराठे परीवाराने ठरविले आहे.
यामधे अश्या एका संस्थेला दरवर्षी रुपये २५००० (रुपये पंचेवीस हजार) रोख दाननिधी तसेच एक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. दरवर्षी स्व. प्रभा मराठे यांच्या स्मृतीदिनी हा पुरस्कार एका संस्थेला समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. यावर्षीच्या पुरस्काराची घोषणा २८ सप्टेंबर रोजी करण्यात येईल आणि योग्य दिवशी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल असेही विलास मराठे यांनी सांगितले. या पुरस्कार प्रदान करण्याच्या प्रक्रीयेला कार्यान्वित करण्याकरीता जसे, संस्थेला भेट, माहिती जाणून घेणे, संस्थेचे योगदान , पुरस्काराकरीता निवड या बाबींकरीता एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. यामधे समिती अध्यक्ष म्हणून अमरावतीच्या महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील यांच्या सह अनंत कौलगीकर, यवतमाळ, पराग पांढरीपांडे, नागपूर, सौ. अनुराधा आळशी, अमरावती आणि प्रा. सावन देशमुख, अमरावती यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या समितीचे कार्य निःपक्षपणे पार पडावे म्हणून यामधे मराठे परीवाराचा कोणीही सदस्य सहभागी राहणार नाही हे त्यांनी आवर्जून सांगितले. या पुरस्कार निवडीमधे सुरुवातीला विदर्भातील सामाजिक संस्थांचा विचार केला जाणार आहे आणि कालानुरुप याची व्याप्ती वाढविली जाणार आहे. दै. हिंदुस्थान तर्फे चालविल्या जाणाऱ्या सामाजिक योगदानाच्या विविध उपक्रमामधे या पुरस्काराचा समावेश होणे ही मराठे परीवाराकरीता अत्यंत गौरवाची बाब आहे असे विलास मराठे यांनी सांगितले. या निमित्ताने निराधार तसेच दीनदुबळ्या लोकांकरीता काम करणाऱ्या विविध संस्थांचा गौरव तर केला जाणारच आहे परंतू सोबतच या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्याबद्दलची माहिती समाजमनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य देखील होणार आहे.
त्यांचे कार्य जाणून घेऊन त्यांना मदत करण्याची अनेकांना प्रेरणा मिळू शकते. म्हणूनच स्व. प्रभा अ. मराठे स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार हा केवळ उपचाराचा भाग राहणार नसून सामाजिक चळवळच ठरणार आहे असा विश्वास विलास अ. मराठे यांनी व्यक्त केला. २८ सप्टेंबर रोजी स्व. प्रभा अ मराठे यांच्या स्मृतीदिनी पहिला पुरस्कार घोषित केला जाणार आहे.
ML/KA/SL
26 Sept. 2023