अमिताभ बच्चन यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकताच यंदाचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्यासह मराठी काही कलाकारांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराची घोषणा पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत काल करण्यात आली. यावेळी ‘लता मंगेशकर पुरस्कार’ आणि महाराष्ट्राचा मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’ सोहळ्याचीही घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या वर्षी ‘लता मंगेशकर पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले होते.
‘लता मंगेशकर पुरस्कार’ आणि ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’ येत्या २४ एप्रिलला या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. २४ एप्रिलला दिनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. दीनानाथ नाट्यगृह येथे हा सोहळा रंगणार आहे.
बिग बी अमिताभ बच्चन यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’, संगीतकार ए.आर.रेहमानला ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’, मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार’, पद्मिनी कोल्हापूरेला ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार’ अतुल परचुरे यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार’, बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाला ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार’ने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी वैद्यकीय, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातल्या दिग्गजांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
SL/ML/ML
17 April 2024