लष्कर ए तैयबा च्या टॉप कमांडरची गोळ्या झाडून हत्या

इस्लामाबाद,दि. १८ : पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची गोळ्या मारून हत्या झाली आहे. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता. त्याला अज्ञातांनी गोळ्या घातल्याचे सांगितले जात आहे.पाकिस्तानातील सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्याच्या माटली तालुक्यात याला गोळ्या घालण्यात आल्या आहेत.
सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या संघटनेचे नेपाळमधील युनिट सांभाळायचा. लष्कर ए तैयबा या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी केडर उभे करणे तसेच आर्थिक मदत पुरवणे हे त्याचे प्रमुख काम होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो नेपाळमध्ये सक्रिय होता. सैफुल्लाह दहशतवाद्यांना नेपाळच्या मार्गे भारतात पाठवण्याचेही काम करायचा.
सैफुल्लाह या दहशतवाद्याचा भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमध्ये मोठा सहभाग होता. रामपूर येथे 2001 साली झालेला रपीएफ कँपवरील हल्ला, 2006 साली झालेल्या नागपुरातील संघाच्या मुख्यालयावरील हल्ला, तसेच 2005 साली झालेल्या बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेस वर झालेल्या हल्ल्याचा यात सहभाग होता.