अखेर लंके लोकसभेच्या रिंगणात , आमदारकीचा राजीनामा

अहमदनगर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी आज अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांना आपण आजच राजीनामा पाठवत असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
लंके यांनी सुपा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधताना त्यांनी विखे पाटील यांच्यावर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टीका केली. विखे यांनी आपल्यावरील रागापोटी पारनेरची सर्व कामे अडवली. त्यांनी मतदारसंघात दहशत निर्माण केली आहे. या दहशतीला पायबंद घालण्यासाठी आपण मैदानात उतरलो असल्याचे लंके म्हणाले.
राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी लंके यांना रडू आले. जनतेने आपणाला निवडून दिले. पण ही लढाई लढण्यासाठी मुदतपू्र्व राजीनामा देण्याची वेळ आली. आपण शरद पवारांना लोकसभा लढविण्याचा शब्द दिला होता. मधल्या वाईट काळात शरद पवारांना साथ देऊ शकलो नाही याचे दु:ख आहे. ती भरपाई करण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत. मुंबईत हा राजीनामा अध्यक्षांना आजच पोहोच होईल तसेच मेलवरही पाठवत आहोत, असे त्यांनी सांगितले.
ML/KA/PGB 29 March 2024