लाल परी झाली ७५ वर्षांची
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लाल परी म्हणून ओळख असलेली राज्य परिवहन महामार्गाची बस सेवा ही महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांना, वाड्यावस्त्यांना जोडणारा दुवा आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी सेवा देणारी, गावातील विद्यार्थ्यांना शाळांपर्यंत पोहोचवणारी, टपाल आणणारी लालपरी आता पंचाहत्तर वर्षांची झाली आहे. 1 जून, 1948 रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने 75 वर्ष पूर्ण केली आहेत.आज देखील ग्रामीण भागापासून शहरी भागात देखील प्रवासासाठी एसटीला मोठी पसंती दिली जाते. विशेष म्हणजे आपल्या शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सूट तर 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरु केली असून या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यात महाराष्ट्राची एसटी सेवा विस्तारली आहे. या विस्ताराचे संपूर्ण श्रेय महामंडळातील अधिकारी, कर्मचारी, वाहक, चालक, तंत्रज्ञ यांचे आहे. त्यांनी आपल्या लाडक्या लालपरीला हिरकणी, शिवनेरी, शिवशाही आणि विठाई या नावांसह आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि आज स्पर्धात्मक युगात देखील ती भक्कम उभी आहे. शासनाच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही जीवनवाहिनी अविरत सुखद प्रवास देत राहील.
पहिली बस 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर मार्गावर धावली. त्या एसटीत एकूण 30 प्रवाशांची क्षमता होती.पहिली एसटी बस ही निळ्या रंगाची लाकडाची होती आणि तिचे छप्पर कापडी होते. या बसचे तिकीट काही पैशांमध्ये होते.
ही पहिली एसटी बस ते आत्ताच्या इलेक्ट्रॉनिक एसटीपर्यंतचा प्रवास अतिशय रंजक आहे.
SL/KA/SL
1 June 2023