मुलीच्या लग्नानिमित्त गावातील मुक्या जनावरांनाही दिली पंगत
बुलडाणा, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील कोथळी या गावातील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश सरोदे यांच्या मुलीचा लग्न सोहळा 7 मे रोजी संपन्न झाला …या लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या वऱ्हडी व नातेवाईक मंडळींसह गावातील मुके प्राणी ,जनावरे यांनाही लग्नानिमित्त पंगत देण्यात आली…. गावातील गुरांसाठी कुटार, ढेप , कुत्र्यांसाठी पोळ्या तर मुंग्यांसाठी साखर ठेवण्यात आली होती . मुलीच्या लग्नात गावातील जनावरेही उपाशी राहणार नाही, असा संकल्प देखील मुलीच्या वडिलांनी केला होता. त्यामुळे प्रकाश सरोदे यांनी मुलीच्या विवाहासाठी ४ एकर जागेत किल्लेदार मंडप उभारला होता.. पंचक्रोशीतील गावातील सर्वधर्मीय लोकांना जेवणासाठी चुलबंद आवतण देण्यात आले होते… शिवाय, लग्नात आहेर पद्धत बंद होती… विशेष म्हणजे, गावातील गुराढोरांना ३ ट्रॉली कुटार,१० क्विंटल ढेप, कुत्र्यांसाठी पोळ्या, मुंग्यांना साखर असा जेवणाचा बेत आखला होता… लग्न सोहळ्यात गाव जेवण हे ठरलेलेच असते… परंतु गावातील जनावरांनादेखील पंगत दिल्याने, या विवाह सोहळ्याला मुक्या प्राण्यांची सुद्धा उपस्थिती होती. त्यामुळे हा विवाह सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला……
ML/KA/PGB 9 May 2023