अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिद्दीच्या जोरावर शारीरिक व्यंगावर मात करून यशाची शिखरे काबीज करणारी अनेक माणसे समाजात दिसून येतात; सातारा जिल्ह्यातील संस्कृती विकास मोरे ही त्यांपैकीच एक.
ऑनलाईन बुद्धीबळ खेळताखेळता ती शाळा, महाविद्यालय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्या स्पर्धेत विजेतेपद पटकावून नावारूपास आली. २०२३ मध्ये होंगझो येथे झालेल्या आशियाई पॅराऑलिम्पिकमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची संधी तिला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत संस्कृतीने महिला सांघिक बुद्धीबळ स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. बुद्धीबळ खेळातील तिच्या कामगिरीमुळे आतापर्यंत जिल्हा क्रीडा पुरस्कार, सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार असे एक ना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच सातारा जिल्ह्याची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही निवड झाली आहे.
तिच्या याच कर्तृत्वाची दखल घेऊन राज्य सरकारतर्फे संस्कृतीला मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) क्लास वन अधिकारीची म्हणून नियुक्त करत तिचा यथोचित सन्मान केला आहे. अगदी कमी वयात म्हणजे १९ व्या वर्षीच आपल्या उपजत कलागुणांमुळे क्लासवन अधिकारी झाल्याने पंचक्रोशीतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज आजूबाजूचे लोक आपल्या मुलांना संस्कृतीचं उदाहरण देऊन आपल्या मुलांना प्रेरित करत आहेत.
ML/ML/PGB
16 Nov 2024