मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु

छ संभाजीनगर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यासाठी सरकारने एक वर्षापासून नियोजन केले. लेक लाडकी योजना आठ-नऊ महिन्यांपूर्वी सुरु केली तेव्हा काय निवडणुका होत्या का, असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांना फटकारले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना निवडणुकीपुरती नाही. विरोधकांनी कितीही आकांडतांडव केले तरी ही योजना कायमस्वरुपी सुरु राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
सिल्लोडमध्ये आयोजित महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रसार , प्रचार कार्यक्रमाचे आयोजन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये केले होते. या महिला मेळाव्याला हजारो महिलांनी उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत बहिणीला महिन्याला १५०० रुपये तर वर्षाला १८००० रुपये मिळणार आहेत. एका घरात दोन बहिणी असतील तर वर्षाला त्या घरात वर्षाला ३६००० रुपये मिळणार आहेत. महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. या विविध योजनांमधून राज्यातील २ कोटी महिलांना लाभ मिळाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लाडकी बहिण योजना सावत्र भावांच्या डोळ्यात खुपू लागली आहे. योजनेसाठी कोर्टात जायचे आणि स्टे घ्यायचा असा प्रयत्न विरोधकांनी केला आहे मात्र लाडक्या बहिणींला कोर्ट न्याय देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कपटी आणि सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहावे. या योजनेत सर्व जातीपातीच्या महिलांना लाभ मिळणार आहेत. अर्थसंकल्पात सरकारने या योजनेसाठी ४६००० कोटींची तरतूद केली आहे. ‘महायुती सरकारचा इरादा नेक, सुरक्षित ठेवणार बहिण आणि माझी लेक’ असे ते म्हणाले.

महिलांना सक्षम केल्याशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही. महिला शक्तीला आपण दुर्गा म्हणतो, केवळ फोटोमध्ये पूजा करुन चालणार नाही तर त्यांचे हात बळकट केले पाहिजे. दोन वर्षांपूर्वी आम्ही महाविकास आघाडीचे नाकाम सरकार उलथवून टाकले होते. आता जनता सुज्ञ आहे. घरी बसणाऱ्यांना नाही तर लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्यांना निवडून देते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाविकास आघाडी व्देषाचे आणि सुडाचे राजकारण करत आहेत. महायुती सरकार सुखाचे आणि समृद्धीचा मंत्र घेऊन काम करत आहे. मराठवाडा म्हणजे दुष्काळवाडा अशी ओळख पुसून टाकायची आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी नदीजोड प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड सारख्या प्रकल्पांतून ते शक्य होणार आहे. यासाठी केंद्र सरकार पाठिशी उभं आहे, असे ते म्हणाले.

घटनाबाह्य मुख्यमंत्री अशी टीका करणारे आता त्यांच्या कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे बोर्ड लावत आहेत आणि फॉर्म भरुन घेत आहेत. अशा लोकांपासून महिलांनी सावध राहावे. सरकारने जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू कार्यालय आणि ऑनलाईन अर्ज स्वीकृती केली जात आहे, अशाच ठिकाणी महिलांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

ML/ML/PGB
2 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *