लाडकी बहिण योजना सुरूच राहील, विरोधकांचा सभात्याग

मुंबई दि १२ — मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि राज्य सरकार योग्य वेळी घेईल अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली, त्यावर लाडक्या बहिणींची फसवणूक सरकारकडून होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभा त्याग केला . यासंदर्भातील प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला होता, त्यावर वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारला.
मंत्र्यांनी उत्तर देताच विरोधक आक्रमक झाले, जागा सोडून पुढे आले, सरकारनं ठोस उत्तर द्यावं अशी त्यांची मागणी होती मात्र अध्यक्षांनी पुढील प्रश्न पुकारून त्यांना बोलण्यास परवानगी नाकारली यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
याआधी याच प्रश्नावर उत्तर देताना तटकरे यांनी अधिक माहिती दिली. ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला लाडक्या बहिणीच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती त्यावेळी दोन कोटी 33 लाख 64 हजार इतकी नोंदणी झाली होती, तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन कोटी 47 लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती देखील तटकरे यांनी यावेळी दिली.
पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत घोषणा होती, त्यानुसार 26 जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना 31 कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यास सुरुवात झाली आहे असंही तटकरे यांनी यावेळी सांगितलं. शासनाच्या विविध योजनांमध्ये लाभ घेत असणाऱ्या महिलांना दीड हजारापेक्षा कमी रक्कम मिळत असेल तर उर्वरित रक्कम शासन या योजनेतून देत आहे असेही तटकरे यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केलं. ही योजना सुरूच राहील त्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
पोषण आहार प्रकरणाची चौकशी
रायगड जिल्ह्यातील वडखळ येथे पोषण आहाराचे वाटप करताना त्यातील काही बंद पाकिटांमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष सापडले नाहीत अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अतिथी तटकरे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र या पाकिटांची तपासणी करण्यासाठी नकार देणाऱ्या दोन सरकारी प्रयोगशाळांच्या संदर्भात तसेच यासंदर्भात ज्या तक्रारी मिळाल्या आहेत त्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी एक समिती नेमून चौकशी करण्यात येईल असेही तटकरे यांनी यावेळी जाहीर केलं.
गर्भलिंग निदान प्रकरणी कठोर कायदा
राज्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि पर्यायाने स्त्रीभ्रूणहत्या होत असल्याबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता या संदर्भात कठोर कायदा करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिली. श्वेता महाले आणि इतरांनी हा प्रश्न उपस्थित केला होता . अशा पद्धतीच्या गर्भलिंग तपासणी करणाऱ्या परराज्यातील टोळ्या रोखण्यासाठी विभागाच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर छाप्याची मोहीम हाती घेण्यात येईल अशी माहिती आबिटकर यांनी यावेळी दिली.